संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस नगरपंचायतीचा मुख्याधिकारी विश्वनाथ दिगंबर वडजे यास रस्ता डांबरीकरणाच्या कामाच्या बिलाच्या चेकच्या मोबदल्यात लाच मागितल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. माळशिरस पोलीस ठाण्यांमध्ये लाचलुचपत अधिनियमाखाली याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
माळशिरस नगरपंचायतीचा लोकसेवक वडजे याने माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंतचा रस्ता डांबरीकरणाच्या कामाच्या बिलाचा चेक तिरुपती कंट्रक्शन यांच्या बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात बिलाच्या तीन टक्के रक्कम लाच म्हणून मागितली असल्याबाबत दि.३०.९.२०२१ रोजी तक्रारदारांनी तक्रारी अर्ज अँटी करप्शन ब्युरो सांगली यांच्याकडे दिला होता. तक्रारदार यांच्या तक्रारीनुसार ३०.९.२१ ते २२.१०.२०२१ रोजी कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली. पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक वडजे (मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस) याने तक्रारदार यांच्याकडे माऊली चौक माळशिरस ते कचरेवाडी हद्दीपर्यंत रस्ता डांबरीकरणाचे कामाचा बिलाचा चेक तिरुपती कंट्रक्शन यांच्या बँक खात्यावर जमा केल्याच्या मोबदल्यात एक लाख रुपये व नवीन कामे मिळवून देण्यासाठी खर्च २६ हजार अशी एकूण एक लाख २६ हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर २२.१०.२०२१ रोजी व १.११.२०२१ रोजी लोकसेवक वडजे (मुख्याधिकारी नगरपंचायत माळशिरस) याच्याविरोधात सापळा कारवाई केली असता वडजे यास संशय आल्याने तक्रारदार यांच्याकडून लाच रक्कम स्वीकारली नाही.
त्याच्याविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
राजेश बनसोडे (पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक) व सुरज गुरव (अप्पर पोलीस उपायुक्त /अप्पर पोलीस अधीक्षक), सुहास नाडगौडा (अप्पर पोलीस उपायुक्त/ अप्पर पोलीस अधीक्षक) तसेच संजय घाटगे (पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो सांगल) यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुदत्त मोरे (पोलीस निरीक्षक), अविनाश पवार , संजय सकपाळ, अजित पाटील, प्रीतम चौगुले, संजय कलकोटी, चालक बाळासाहेब पवार, पोलीस कर्मचारी, अँटी करप्शन ब्युरो सांगली यांनी केली.



संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या