बैलपोळा सणावर कोरोनाचे सावट; माळशिरस शहर व परिसरात बैलपोळा घरोघरीच साजरा

संजय हुलगे/माळशिरस तालुका प्रतिनिधी :

माळशिरस शहर व परिसरात बैलपोळा सण शेतकऱ्यांनी प्रशासनाने घरीच सण साजरा करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या घरीच साजरा केला .यांत्रिकी युगामध्ये बैलाची संख्या कमी झाली आहे. बैलांच्या कामाची जागा यंत्रांनी घेतली तर बैलाची जागा दुबत्या जनावरांनी घेतली असून शेतकरीवर्ग त्यांची पूजा त्याच उत्साहात करताना दिसून आला .

आजही शेतकऱ्यांच्या जीवनात बैलाचे मोठे स्थान आहे .सध्या शेतीसाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे, परंतु सामान्य गरीब शेतकऱ्याला ते परवडत नाही. त्याचे जीवन बैलावरच अवलंबून असते .शेतकऱ्याला सर्वच शेतीच्या कामात त्याची मदत होत असते. त्यामुळे त्याला दैवत मानून वर्षातून एकदा त्याला विश्रांती देणे,त्याची पूजा करणे, वर्षभर शेतात शेतकऱ्यांसमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे शेतकरी पाहतो . हिंदू संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच प्राणीजीवांनाही देखील पूजनीय मानले जाते.

माळशिरस शहर व परिसरात आषाढ शुद्ध पौर्णिमेला शेतकऱ्यांचा महत्वाचा पोळा सण साजरा करण्यात येतो . या सणादिवशी बैलांना नदीवर ,ओढ्यावर ,नेऊन अंघोळ घातली जाते . घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके देऊन, शिंगाना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्त कवडया आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमधे चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. नवी वेसण, नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झुल पांघरली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासिनी बैलांची विधीवत पुजा करतात.

आता बैलांची संख्या कमी झाली आहे.परंतु अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करीत आहेत .आता शेतकऱ्यांच्या दारात गाई ,म्हैशीचे मोठ-मोठे गोठे दिसून येत आहेत .शेतकऱ्यांनी याही जनावरांना बैलाप्रमाणेच सजवून त्याची पूजा केल्याचे दिसून आले .

अनेक हौशी शेतकरी आपली बैले गावात नेऊन त्यांची फटाक्याच्या आतषबाजीत वाद्य मिरवणूक काढत होते.या सणाचा मान पाटील घराण्याकडे असून त्यांनीही आपल्या बैलाचे पूजन घरीच केले . बैलांच्या समोर नाच-गाण्याचे कार्यक्रम होत असत,परंतु यावर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांनी आपल्या घरीच बैलाची पूजा करावी, असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी बैलांची घरीच पूजा केली .