

मानद वन्यजीव संरक्षकांची भेट
डबई कुरणाचे पक्षी अभयारण्यामध्ये रूपांतरणासाठी होणार प्रयत्न !
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी येथील स्वतंत्रपूर येथे असलेल्या डबई कुरणामध्ये जगविख्यात पक्षी तज्ञ डॉ. सलीम अली व मारुती चितमपल्ली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि. ५ ते १२ नोव्हेंबर या दरम्यान साजरा होत असलेल्या पक्षी निरीक्षण सप्ताहानिमित्त दिनांक ९ व १० नोव्हेंबर रोजी पक्षीनिरीक्षण मोहिम आयोजित करण्यात आली.
या मोहिमेत सांगली येथील मानद वन्यजीव संरक्षक डॉ.अजित साजणे,माजी मानद वन्यजीव संरक्षक अजित ऊर्फ पापा पाटील,वाइल्ड लाइफ वॉर्डन अजित पाटील, पक्षी अभ्यासक शरद आपटे, पक्षी अभ्यासक डॉ.शिवाजी विभुते,अँड.बसवराज , वनस्पती अभ्यासक डॉ.धनंजय लोहार,पक्षी अभ्यासक समृद्धी पानसरे, जय पाटील, आर एफ ओ खाडे व त्यांचा सर्व स्टाफ सहभागी झाले.
दोन दिवस चाललेल्या या मोहिमेत एकूण ४२ जातींच्या ३०००-४००० पक्ष्यांची नोंद करण्यात आली. पक्षी निरीक्षण करण्यामध्ये शरद आपटे व डॉ. शिवाजी विभुते यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ.धनंजय लोहार यांनी डबई कुरणांमध्ये असलेल्या १९० जातींच्या वनस्पतींची माहिती दिली. डॉ. शिवाजी विभुते यांनी डबई कुरण व आसपास सापडणाऱ्या १४ जातीच्या सापांची व इतर सरपटणारे व सस्तन प्राणी यांची माहिती दिली. भविष्यामध्ये या डबई कुरणाचे पक्षी अभयारण्यामध्ये रुपांतर होऊ शकते असा विश्वास अजित पाटील व डॉ. अजित साजणे यांनी व्यक्त केला. येणाऱ्या काही कालावधीमध्ये आटपाडीतील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग तसेच वसुंधरा निसर्ग मंडळ आणि महाराष्ट्र शासनाचा वन्यजीव विभाग यांच्या मदतीने व सहकार्याने डबई कुरणाचे रूपांतर पक्षी अभयारण्यामध्ये करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी सर्व घटकांचे सहकार्य लागणार आहे, असे मत डॉ. अजित पाटील व डॉ.अजित साजने यांनी व्यक्त केले.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन