एनयुजे महाराष्ट्रच्या पत्रकारांना ‘कृषिकन्या’ संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

सांगली/ प्रतिनिधी:
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या सांगली जिल्ह्यातील सभासद पत्रकारांना आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील प्रगतीशील शेतकरी व कृषिकन्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक रुपेश गायकवाड  व त्यांचे बंधू अमर गायकवाड यांनी गरजू लोकांबरोबर पत्रकारांनाही जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.
  नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस्  महाराष्ट्रच्या राज्य अध्यक्ष शीतलताई करदेकर यांनी कोवीड-19 प्रादुर्भावाच्या काळात लॉक डाऊनमध्ये अडकलेल्या अनेक गरजू गोर-गरिबांना युनियनमार्फत मदतीचा हात पुढे करावा, असे राज्यभरातील पदाधिकारी व पत्रकारांना आवाहन केले होते. त्याप्रमाणे गरजूंना मदत करण्यात आली.
कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे घटक असणारे  पत्रकार  यांचीही या काळात काही ठिकाणी उदरनिर्वाहाची अडचण निर्माण झाली होती. यावर उपाययोजना करण्यासाठी पत्रकारांनाही सेवाभावी लोकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे कीट मिळावे असा त्यांचा मानस होता. 
सांगली  जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके यांच्या नेतृत्वाखाली युनियनचे आधारस्तंभ असणारे पत्रकार अशोक पवार यांच्या प्रयत्नाने शेटफळे येथील प्रगतशील शेतकरी बंधू रुपेश गायकवाड व अमर गायकवाड यांनी कृषिकन्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून युनियनच्या सर्व पत्रकारांनाही जीवनावश्यक वस्तूचे किट दिले.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस्  महाराष्ट्राच्या आटपाडी येथील कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात सामाजिक अंतर व इतर  नियमांचे  पालन करून या किटचे वाटप करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके,तालुकाध्यक्ष नंदकुमार विभुते,सचिव अक्षय बनसोडे, कृषिकन्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रुपेश गायकवाड, एन एम न्यूजचे संपादक अशोक पवार, सीबीएस न्यूजचे कार्यकारी संपादक गुलचंद भोरे व काही पत्रकार प्रतिनिधी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते.
यावेळी रुपेश गायकवाड म्हणाले,’कोरोनाच्या काळात  पत्रकारांनी  स्वतःचा जीव धोक्यात घालून  अतिशय प्रामाणिकपणे काम केले आहे. समाजाच्या जडणघडणीमध्ये  पत्रकारांची भूमिका  खूप महत्त्वाची असून  गरजू लोकांबरोबर  त्यांनाही मदतीचा  हात मिळावा, म्हणून  संस्थेच्यावतीने युनियनच्या पत्रकारांना माझ्या परीने मदत करीत आहे.
जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रा.डॉ.रामदास नाईकनवरे यांनी स्वागत केले व सचिव अक्षय बनसोडे यांनी आभार मानले.