
संजय हुलगे /माळशिरस तालुका प्रतिनिधी:
उमरगा तालुक्यातून शंभू महादेवाच्या दर्शनासाठी येणा-या महिला भाविकांच्या गाडीवर शिंगणापूर घाटात दरोडा टाकून सुमारे १ लाख रुपयांचे दागिने लुटणा-या टोळीचा नातेपुते पोलिसांनी छडा लावला.याप्रकरणी फलटण तालुक्यातील गोखळी येथे विटभट्टीवर काम करणा-या तिघांना पोलिसांनी जेरबंद केले.
घडलेल्या गुन्ह्याची हकीकत अशी, उमरगा व चिवरी तालुका तुळजापूर येथील महिला भाविकभक्त जेजुरी येथे देवदर्शन करून शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शनासाठी जात असताना नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत फलटण ते शिंगणापूर रस्त्यावर कोथळे ता. माळशिरस येथील कोथळे घाटात दिनांक ११ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास क्रुझर गाडी आडवून अनोळखी सहा इसमानी गाडीच्या काचा फोडल्या. गाडीतील महिलांना व पुरुषांना शिवीगाळ, दमदाटी करून १ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरली.याबाबतची तक्रार नातेपुते पोलीस ठाणे येथे चालक चैतन्य सखाराम बडूरे यांनी दिली होती.यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे हे तपास करीत होते. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदार याचेमार्फत व तांत्रिक माहिती मिळवून सदर गुन्हा करणारे संशयित हे फलटण तालुक्यातील गोखळी गावात वीटभट्टीवर काम करत असलेबाबत माहिती मिळाली.
याठिकाणी चौकशी करता आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील असल्याचे समजले. त्यामुळे सदर आरोपींचा शोध घेणेकामी नातेपुते पोलीस यांचेकडून एक तपास पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले. आरोपींचा शोध घेत असताना संशयित इसम राहुल आप्पासाहेब माळी (वय १९) रा. मुसळवाडी ता. राहुरी,राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्डे, (वय २२) रा. पडेगाव ता. श्रीरामपूर,संदीप सुरेश पिंपळे (वय २२) रा. मानेगाव ता. सिन्नर सध्या माणुरी ता. राहुरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदार यांचे मदतीने केला असल्याचे कबूल दिली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींस ६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
ही कामगिरी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, पोलीस हवालदार अनिल गणपत गडदे ,शरद रामलिंग कदम ,राहुल सुग्रीव रणनवरे, पोलीस नाईक महेश भास्करराव पाटील, पोलीस हवालदार राकेश माणिक लोहार व सायबर शाखेचे पोलीस हवलदार रवी हातकिले यांनी केली. गुन्ह्याचा अधिक तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे करीत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती