…आणि जतकरांना आज मिळाले पाणी !

प्रगल्भनायकचा दणका !
अनिल मदनेः
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार न दिल्यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी संपावर होते.दोन दिवस जत शहराचा पाणीपुरवठा बंद होता.पाणी नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत होते.पाणीपुरवठा करणाऱ्या ठेकेदाराच्या मुजोरपणामुळे व राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे जत शहरातील नागरिकांना पाण्यापासून वंचित रहावे लागले. याबाबतचे वृत्त प्रगल्भनायक न्यूजमधून प्रसिद्ध होताच त्याच्या दणक्याने आज जत शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पाणी प्रश्नाला तातडीने वाचा फोडल्याप्रकरणी नागरिकांनी प्रगल्भनायकचे अभिनंदन केले आहे.
सुमारे ४० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या जत शहरास आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. शहरातील अनेक प्रभागात पाणी वेळेवर सुटत नाही आणि पाणी पोहोचले तर त्याचा कमी दाबाने पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना मोटारीच्या सहाय्याने पाणी भरावे लागते. शहरातील काही प्रभागांमध्ये रात्री-अपरात्री पाणी सोडले जाते. त्यामुळे नागरिकांना रात्रभर जागे राहून पाण्यासाठी वाट पाहावी लागते.
जत शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे, पण त्यामानाने नगरपरिषदेच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. नागरिकांना पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागते.पाण्याची अडचण पाहून टँकरवाल्यांचीही चांगलेच फावले आहे.
जत शहराच्या पश्चिमेस असलेल्या बिरनाळ तलावात म्हैसाळच्या पाण्यासह पावसाच्या पाण्याने तलाव पूर्ण भरलेला आहे. जत शहराचा रोज पाणीपुरवठा होईल, इतपत पाणीसाठा बिरनाळ तलावात शिल्लक आहे. परंतु तलावात पाणी असूनही शहराची तहान भागत नसल्यामुळे पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था जत शहराची झाली आहे.याचा फटका शहरातील अनेक प्रभागातील नागरिकांना बसत आहे.
पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास माजी नगरसेवक परशुराम मोरे यांनीही आंदोलनाचा इशारा दिला होता.
आज जत शहराचा पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. पाणी प्रश्नाला तातडीने वाचा फोडल्याप्रकरणी नागरिकांनी प्रगल्भनायकचे अभिनंदन केले आहे.