जतमध्ये रिपाईंचे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात,तसेच मागासवर्गीय समाजावर होत असलेले अन्याय व अत्याचार रोखावेत,आदि मागण्यांसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जत तालुक्याच्यावतीने येथील उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यांत आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हा उपाध्यक्ष विकास (काका ) साबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्यावतीने महाराष्ट्र राज्यात आज पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती कमी कराव्यात, कारण पेट्रोल व डिझेलच्या किंमती व घरगुती गॅसच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.स्वयंपाकाच्या घरगुती गॅसच्या किंमती वाढल्याने गृहिणी संतप्त झाल्या आहेत. त्यांचे अर्थिक नियोजन कोलमडले असून कसे जगायचे? हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला आहे. त्यामुळे स्वयंपाकाच्या घरगुती गॅसच्या व पेट्रोल व डिझेलच्या आवाक्याबाहेर गेलेल्या किंमती कमी कराव्यात ही प्रमुख मागणी आहे.
राज्यात व देशात मागासवर्गीय समाजातील लोकांवर अन्याय व अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे मागासवर्गीय समाज न्यायासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे व जे या समाजावर अन्याय अत्याचार करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी केली.
त्याचप्रमाणे राज्यात खून,मारामा-या,महिलांवर व आदिवाशी जनतेवर अन्याय,अत्याचार वाढले आहेत. हे थांबले पाहिजे व अन्याय अत्याचार करणारांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी केली आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होवून शेतकरी बांधवांच्या लाखो हेक्टर बागायती जमिनी पाण्याखाली जाऊन शेतीचे अतोनात असे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार आता जी मदत शेतक-यांना देत आहे, ती मदत तुटपुंजी असून शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतक-यांना भरीव अशी मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
यावेळी येथील उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट युवक जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.हेमंत चौगुले,जत तालुका अध्यक्ष संजय कांबळे (पाटील), किशोर चव्हाण, शंकर वाघमारे, रामकृष्ण गंगणे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शंकर पडसलगी, विजय पाटील,मातंग आघाडी तालुकाध्यक्ष दुर्गाप्पा ऐवळे, राहुल चंदनशिवे, सुभाष कांबळे, महाविर मडीमणी, विनोद कांबळे, संजय कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
जत तालुका प्रहार संघटनेचे महादेव हुचगोंड यांंनी या आंदोलनाला पाठींबा दिला.