मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई मिळवून देणार : सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड नंबर ६ भिंगेवाडी पूर्व भाग व भिंगेवाडी परिसरामध्ये जनावरांमध्ये लाळ खुरकत (फुट अँड माउथ डिसीज) रोगाचा अचानक प्रादुर्भाव झाल्याने या भागातील मोठी १४ जनावरे व लहान २१ जनावरे मृत्युमुखी पडली. त्याची दखल घेऊन सदर ठिकाणी आटपाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे जाऊन पशुधनाची पाहणी केली व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागेवरूनच आमदार अनिलभाऊ बाबर यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती देऊन ज्या शेतकऱ्यांचे पशुधन दगावले आहे, त्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई मिळावी, तसेच अजून काही जनावरे आजारी आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च शासनाकडून मिळवून द्यावा,अशा प्रकारची विनंती करण्यात आली.
यावेळी आमदार अनिलभाऊ बाबर यांनी संबंधित पदाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
शेतकरी बंधू-भगिनी यांनी वेळोवेळी संबंधित रोगांचे लसीकरण करून घ्यावे व अगोदरच जनावरांचा विमा उतरावा जेणेकरून आपणास नुकसान भरपाई मिळू शकेल अशा प्रकारच्या सूचनाही सरपंचांनी शेतकऱ्यांना केल्या. तसेच तालुक्यातील पशुवैद्यकीय डॉक्टर वेळोवेळी चांगली सेवा शेतकऱ्यांना देतात. त्याचप्रमाणे आताही या गंभीर परिस्थितीत उपस्थित डॉक्टरांनी शेतकऱ्यांना जलद व चांगली सेवा द्यावी, अशी विनंतीही सरपंच यांनी उपस्थित डॉक्टरांना केली.
यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी सदर आजारांमध्ये जनावरांच्या तोंडावर व पायाच्या नखांमध्ये जखमा होतात. तसेच जनावराच्या तोंडाला फेस येतो व तोंडाला झालेल्या जखमांमुळे जनावर वैरण खात नाही, अशा प्रकारची लक्षणे जनावरांमध्ये दिसून येतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी जनावरांच्यावर बारीक लक्ष ठेवावे व लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला व डॉक्टरांच्याकडून तात्काळ वेळोवेळी उपचार घ्यावेत, असे आवाहन केले.
यावेळी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड.धनंजय पाटील, डॉ अविनाश चव्हाण, डॉ. लक्ष्मण गाढवे, डॉ बाळासाहेब पाटील, भिंगेवाडीच्या उपसरपंच सौ. शारदा तळे ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार, पोलिस पाटील वसंतराव तळे, विकास खरात तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.