आटपाडी येथे कोयता मेळावा संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / आटपाडी :
साखर कारखानदारांच्या चुकीच्या धोरणामुळे ऊस तोडणी मुकादम व वाहतूकदार खाजगी सावकारांच्या पाशात अडकलेले आहेत.कर्जबाजारी झाल्याने त्यांनी जमिनी विकल्या तर कर्जाला कंटाळून अनेकांनी आत्महत्या केल्या.यापुढे आत्महत्या करू नका.ज्यांच्यामुळे आत्महत्या झाल्या, त्यांना आता सोडायचे नाही.आता मागे हटायचे नाही,लढा सुरूच ठेवायचा. भिवघाटाच्यावर एकही वाहन जाऊ देणार नाही,असा इशारा महाराष्ट्र जनविकास कामगार संघटनेचे संस्थापक सरचिटणीस हरिदास लेंगरे यांनी आटपाडी येथील कोयता मेळाव्यात केला.
आटपाडी येथे जनविकास कामगार संघटनेचे सरचिटणीस हरिदास लेंगरे यांच्या वतीने ऊस तोडणी कामगार, मुकादम व वाहतूकदारांच्या समस्या याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी आटपाडी येथे शनिवारी कोयता मेळाव्याचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना हरीदास लेंगरे म्हणाले, उचल देताना साखर कारखान्याकडून मुकादम व वाहनधारकांना जबाबदार धरले जाते.मात्र ऊस तोडणी कामगारांना त्यात सामील करून घेतले जात नाही.त्यामुळे अनेक ऊस तोडणी कामगार अनेकांकडून उचल घेऊन कामावर येत नाहीत. याचा नाहक फटका बसत आहे. कारखान्याकडून केवळ पाच लाख उचल दिली जाते. तर मुकादमाकडून कामगारांना दहा लाखाहून अधिक रक्कम द्यावी लागते. हे पैसे देण्यासाठी त्यांना खाजगी सावकाराचा आधार घ्यावा लागतो. उचल देऊन कामगार न आल्यास त्याचा भुर्दंड त्यांना सोसावा लागतो. त्यामुळे ते अधिक कर्जबाजारी होऊन ते आत्महत्या करताहेत.
डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. त्याप्रमाणात वाहतुकीत वाढ झालेले नाही. डिझेल व वाहनांचा मेंटेनन्स यासाठी अधिक पैसे खर्च होत आहेत. त्या प्रमाणात त्यांना कारखान्याकडून पैसे मिळत नाहीत. आधीच बँकेकडून कर्ज काढून वाहने घेतली आहेत. ते पुन्हा अधिकच कर्जबाजारी होत आहेत. कर्ज फिटत नसल्याने त्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. कारखानादाराकडून त्यांची पिळवणूक केली जाते. अशा कारखानदारांची मस्ती जिरवायची असेल तर आपण संघटित झाले पाहिजे. चळवळ अधिक तीव्र केली पाहिजे. आपल्यात लाचारीची भावना जोपर्यंत आहे, तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. ज्यांच्या मुळे आत्महत्या होत आहेत, त्याला सोबत घेऊनच जाऊया. हे सर्वजण चोर आहेत. यांच्या विरोधात आपण लढायचे आहे. आता कोणाची दलाली करू नका. यापुढे ऊसावरचा कोयता अन्याय करणाऱ्यावर चालवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार हरिदास लेंगरे यांनी केला.
कामगारांनी बंद ठेवला तर एक कारखाना चालणार नाही. कामगाराचे शोषण करू नका अन्यथा मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा मेघराज लेंगेरे यांनी दिला.डिझेल, स्पेअरपार्ट दरवाढ,उचल घेऊन कामगारांकडून फसवणूक, त्यासंबंधात पोलिसात तक्रार घेत नाहीत. ऊसतोड कामगारांना ओळखपत्र द्यायला हवे. यासाठी कायदा हवा. कोयता चांगला दिला जात नाही. यासह अनेक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी शिवाजी लेंगरे, नंदकुमार कोकरे, महादेव शिंदे, प्रा. राजेंद्र कांबळे, बापू सरगर, अंकुश मुढे यांनीही त्यांचे विचार मांडले. राजेंद्र कांबळे, सचिन ऐवळे, सर्जेराव कोल्हटकर, प्रदीप शिंदे, सहदेव शिंदे, राहुल दुधाळ यांच्यासह अनेक मुकादम व वाहतूकदार उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन