एअर कमोडोर सुहास भंडारे यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक प्रदान

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडीचे सुपुत्र एअर कमोडोर सुहास प्रभाकर भंडारे यांना भारतीय हवाई दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी प्रजासत्ताकदिनी विशिष्ट सेवापदक जाहीर केले होते. दिल्ली येथे हवाईदल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भारताच्या तिन्ही दलांचे प्रमुख बिपीन रावत यांच्या उपस्थितीत भारतीय हवाईदल प्रमुख व्ही.आर.चौधरी यांच्या हस्ते हे विशिष्टट सेवा पदक एअर कमोडोर सुहास भंडारे यांना प्रदान करून गौरविण्यात आले.
आटपाडी येथील पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते प्रभाकर भंडारे यांचे सुपुत्र,पत्रकार प्रशांत भंडारे यांचे जेष्ठ बंधू एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी आपल्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत हवाई दलात उल्लेखनीय कामगिरी केली.त्यांच्या या कामगिरीची दखल घेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुहास भंडारे यांना विशिष्ट सेवा पदक जाहीर केले होते.
हवाईदल प्रमुख व्ही.आर.चौधरी यांच्या हस्ते सुहास भंडारे यांना हे विशिष्ट सेवा पदक देऊन सन्मानित केले.
माणदेशातील आटपाडी या छोट्याशा तालुक्यातील सुहास भंडारे यांनी हवाईदलात मिळालेल्या संधीचे चीज केले आहे.नियुक्ती झालेल्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामगिरीचा ठसा उमटविला आहे.
पुणे येथील सेव्हन टेट्रा स्कुलच्या प्राचार्यपदी आणि पुणे येथील एअरफोर्स तळावर नाईन बी.आर.डी. चे एअर ऑफिसर कमांडिंग म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.सध्या ते दिल्ली येथे सेवा बजावत आहेत.
शालेय जीवनात श्री भवानी विद्यालय आणि राजारामबापू हायस्कूल या आटपाडी येथील सर्व शिक्षकांनी समर्पित भावनेने दिलेले ज्ञान आणि आई (स्मिता भंडारे), वडील (प्रभाकर भंडारे) यांनी केलेले संस्कार,पत्नीची (प्रीती भंडारे) समर्थ साथ आणि कामाप्रती ठेवलेली श्रद्धा या शिदोरीच्या जोरावर हे विशिष्ट सेवा पदक मिळाल्याचे सांगत देशासाठी योगदान देता आल्याचे समाधान वेगळेच आहे,अशी प्रतिक्रिया एअर कमोडोर सुहास भंडारे यांनी दिली.