दि.११ रोजी केंद्र शासनाच्या विरोधात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन

आटपाडी तालुक्यातून महाविकास आघाडी सक्रिय सहभागी होणार: हणमंतराव देशमुख
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व चीड आणणारा आहे. महाविकास आघाडी सरकार या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून या निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आले आहे. आटपाडी तालुक्यातही महाविकास आघाडीकडून पाळण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आटपाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हणमंतराव देशमुख, आटपाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष डी.एम.पाटील यांनी आटपाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.यावेळी युवा नेते सौरभ पाटील, ज्ञानेश्वर होळे, अजिनाथ जावीर,सुशांत गुळीग, आदि उपस्थित होते.
उत्तर भारतातील शेतकरी गेली अनेक महिने आपल्या न्याय हक्कासाठी शांततेत आंदोलन करून केंद्रातील मोदी सरकारकडे आपले म्हणणे सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु वेळोवेळी हे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या सरकारतर्फे दाबण्याचा, भरकटविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु त्यामध्ये त्यांना पूर्णत: यश आलेले नाही. शेतकरी आंदोलन साम-दाम-दंड-भेद वापरूनदेखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांनाच संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालवला आहे.उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या गावातील शेतकऱ्यांना केंद्रातील मंत्र्याच्या गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रकार हा अत्यंत निंदनीय व तीव्र चीड आणणारा आहे. भारत कृषीप्रधान देश असताना या देशात शेतकऱ्याला अशी वागणूक? दिली जात आहे.
अशावेळी महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे असून या निर्दयी कृत्याचा निषेध म्हणून सोमवार दि. ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंद पाळण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून केंद्र सरकारच्या या विक्षिप्त कृतीचा निषेध करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र बंदच्या या हाकेमध्ये सामील होऊन आटपाडी, दिघंची, करगणी व खरसुंडी गटातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सामील होऊन बंद यशस्वी करावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष देशमुख यांनी केले आहे.
यावेळी देशमुख बोलताना पुढे म्हणाले,कृषिप्रधान देशात उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनावर हल्ला करून शेतकऱ्यांना चिरडून मारले गेले हे कृत्य माणुसकीला काळिंबा फासणारे आहे. या घटनेचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात येत आहे.
ते पुढे म्हणाले, देशात शेती आणि शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत,मोदी सरकार राजेशाही पद्धतीने देश चालवू पाहत आहे,एकाधिकार पद्धतीने देशाचे तुकडे होतील. कृषिप्रधान देशात दोन वेळचे पोट भरण्यासाठी इतर देशांवर अवलंबून रहावे लागेल, यासाठी शेतकरी वाचला पाहिजे. यासाठी केंद्र शासनाच्या विरोधात महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदमध्ये तालुक्यातून महाविकास आघाडी सक्रिय सहभागी असेल.तालुक्यातील सर्व व्यापार बंद ठेवून, तहसीलदारांना निवेदन देऊन या दिवशी निषेध व्यक्त केला जाणार आहे. त्या निवेदनात दोषींवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, मृत शेतकऱ्यांना न्याय मिळावा, शेतकऱ्यांच्या विरोधात ज्या जाचक अटी आहेत, त्या रद्द कराव्यात अशी मागणी यावेळी केली जाणार आहे,असेही ते म्हणाले.