
गव्हाण येथे ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /तासगाव:
प्रत्येक भारतीय ज्येष्ठ नागरिकास दरमहा १० हजार रुपये सन्मानधन मिळालेच पाहिजे,तो त्यांचा संविधानिक हक्क आहे, अशी आग्रही मागणी अर्थक्रांती व राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियानाचे सांगली जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील यांनी केली. तासगाव तालुक्यातील गव्हाण येथे संपन्न झालेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हा सचिव गजानन पाटील होते.
ते म्हणाले,’अपवाद वगळता ज्येष्ठ नागरिकांनी देशाला आजही कर्तबगार तरुण पिढी दिली.सरकारचे सर्व कायदे कानून पाळले.सर्व प्रकारचे कर भरले.देश प्रगतीमध्ये सहभाग घेतला. आज हाच जेष्ठ नागरिक सर्व सुविधांपासून वंचित आहे. औषधाला पैसे नसतात, मुले सांभाळत नाहीत, घरात कोणी विचारत नाही, अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत.म्हणून त्यांना पेन्शनची गरज आहे.सरकारचे लक्ष वेधण्यासाठी देशभर आंदोलन उभारले आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची नावनोंदणी चालू आहे. आपला आधारकार्ड नंबर व सहभाग मूल्य १० रुपये देऊन नावनोंदणी करा,असे आवाहन उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी केले.
‘ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच’ या प्रस्ताव अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची ६० वर्षे वयोमर्यादा मान्य करून एसटी बस प्रवास सवलत द्या, दरमहा १० हजार रुपये सन्मानधन द्या, सन्मानपूर्वक वागणूकीसाठी विशेष आचारसंहिता तयार करा, संरक्षण,वाहतूक, कायदा व सुव्यवस्था अशा नागरी सुविधा विशेष श्रेणीच्या स्वरूपात उपलब्ध करून द्या, प्रतिष्ठेच्या जीवनलाभासाठी निर्णय घेणारे स्वतंत्र मंत्रालय, कॅबिनेट मंत्री व त्या खात्यात स्वतंत्र बजेट अशी व्यवस्था करा,अशा मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. त्याच्या पाठपुराव्यासाठी देशभर आंदोलन उभा राहत असून त्यासाठी सज्ज रहा,आपली नावनोंदणी करा,असे आवाहन जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.
ते पुढे म्हणाले, ‘ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्तीच’ या प्रस्तावाच्या यशस्वीतेमुळे शहरांकडे होणाऱ्या स्थलांतरणाला आळा बसेल, कुटुंबव्यवस्था बळकटीस मदत होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, भेदभावविरहित नव्या मानवता धर्माची सुरुवात होईल, म्हणून आपला हा प्रस्ताव मंजूर होणे ही काळाची गरज आहे.
अर्थक्रांतीचे गव्हाणचे अध्यक्ष अरुण पाटील, शंकरराव जाधव, शिवाजी काशीद, भैय्या सरवदे, धनाजी जाधव, नारायण शिंदे, अशोक सरवदे, शरद पवार, एकनाथ पवार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. अध्यक्ष अरुण पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. फेस्काँमचे अध्यक्ष अशोक देसाई यांनी आभार मानले. आटपाडी तालुका अध्यक्ष नंदकुमार राक्षे व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती