जत बचतभवनचे स्ट्रक्चरल ऑडीट करा : जि.प.सदस्य सरदार पाटील

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत येथील पंचायत समितीच्या बचतभवन सभागृहाची दूरावस्था झाली असून हे सभागृह जीर्ण झाले आहे.त्यामुळे या सभागृहाचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले पाहिजे,अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यानी माध्यमांशी बोलताना केली.
पाटील म्हणाले की, सांगली जिल्ह्यात सर्वच तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदेने पस्तीस वर्षांपूर्वी बचतभवन सभागृहाची बांधकामे केली होती. सद्या जत येथील बचतभवन सभागृहाची इमारत वगळता जिल्ह्यातील बहुतांशी इमारती या पाडण्यात आल्या आहेत.परंतु जत येथील इमारत जीर्ण व धोकादायक होऊनही या इमारतीकडे पंचायत समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
जत येथील बचतभवनची इमारत ही जत-सांगली या मार्गावर असून जत पंचायत समिती ही इमारत विविध कार्यक्रमासाठी भाड्याने देत आहे.
ही इमारत सद्या मोडकळीस येऊन जीर्ण झाल्याने धोकादायक बनली आहे.सद्यस्थितीत या इमारतीचे खालील बाजूचे प्लॅस्टर निघाले आहे.त्याचप्रमाणे इमारतीच्या पश्चिम बाजूच्या पोर्चची दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या खिडक्यांची तावदाने लोंबकळत आहेत.तसेच इमारतीचे लोखंड गंजून इमारत मोडकळीस आली आहे.
बचतभवन जतची ही इमारत जीर्ण व धोकादायक अशी झाली असतानाही या इमारतीत सद्या स्केटींग ,तसेच सामाजिक व राजकीय कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
अशी वस्तुस्थिती असताना व ही जीर्ण व धोकादायक इमारत आहे हे माहित असतानाही जत पंचायत समिती ही इमारत भाड्याने देवून अनेक नागरिकांच्या जीवांशी खेळण्याचे काम करीत आहे.
भविष्यात या जीर्ण व मोडकळीस आलेल्या बचतभवन इमारतीत होणारी मोठी दुर्घटना टाळायची असेल तर या इमारतीचे त्वरीत स्ट्रक्चरल ऑडीट झाले पाहिजे अशी मागणी आहे.
बचतभवन जतचे जोपर्यंत स्ट्रक्चरल ऑडीट व जिर्णोध्दार होत नाही,तोपर्यंत ही इमारत कोणालाही वापरायला देऊ नये अशी मागणी आहे.
या मागण्यांचा पंचायत समितीने विचार न करता जर इमारत भाड्याने दिली व एखादी दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही पंचायत समितीवर राहील.त्यामुळे या इमारतीचे त्वरीत स्ट्रक्चरल ऑडीट करावे व पुढील अनर्थ टाळावा असेही सरदार पाटील म्हणाले.