रस्त्याच्या मध्येच ठेवला वीजेचा खांब..

…नाहीतर बंद पाडणार रस्त्याचे काम!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडे जाणारे रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध विद्युतपोल राखून काम सुरू केल्याने या ठेकेदाराला सन्मानित करावे (?) अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
जत नगरपरिषद १४ वा वित्त आयोग योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या सांगली रोड आय.टी.आय.काॅलेज ते ईदगाह मैदान या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदार यांनी रस्त्यातील विद्युल पोल न हटविता,गटारी व सिडीवर्क न करता काम सुरू केले असून हे काम करणाऱ्या ठेकेदाराची खातेनिहाय चौकशी करावी तसेच निकृष्ठ व दर्जाहिन काम करणारे ठेकेदार यांचे नाव काळ्या यादीत समाविष्ट करावे अशी मागणी या परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत शहरासह तालुक्यातील रस्त्याची कामे निकृष्ठ व दर्जाहिन अशी झाली असून सद्या जी कामे सुरू आहेत,ती कामेही निकृष्ठ अशी करण्यात येत आहेत,असा आरोप करण्यात येत आहे.
येथील सांगली रोड,आय.टी.आय.काॅलेज ते ईदगाह मैदान या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटाने करण्यात आले होते. जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या शुभहस्ते व जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांच्या तसेच नगरसेवक स्वप्निल शिंदे,नगरसेविका सौ.बाळाबाई मळगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते.
जत नगरपरिषद १४ वा वित्तआयोग योजनेंतर्गत येथील सांगली रोड,आय.टी.आय.काॅलेज ते ईदगाह मैदान या ४६ लाख, ६० हजार रूपये खर्चाच्या डांबरीकरण कामाला मंजूरी मिळाली असून सध्या या कामाच्या ठेकेदाराने खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे.
हे रस्त्याचे काम मंजूर करीत असताना रस्त्याच्या बाजूला गटार करणे अवश्यक असताना गटारीचे काम न करताच रस्त्याचे काम सुरू केले आहे.
हे काम सुरू करीत असताना या ठेकेदाराने रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत पोल न काढताच हे काम पूर्ण करण्याची गडबड सुरू केली आहे. त्याचप्रमाणे या रस्त्याचे काम करीत असताना सिडीवर्कचे काम बाजूला ठेवले आहे.रस्ता समांतर न करता रस्त्यावर चढ-उतार ठेवले आहेत.
या रस्त्याचे कामही निकृष्ठ व दर्जाहिन असे झाले असून या संपूर्ण कामाची खातेनिहाय चौकशी करावी तसेच रस्त्याच्या मधोमध असलेला विद्युत पोल काढल्याशिवाय व सिडीवर्कचे काम पुर्ण केल्याशिवाय सबंधित कामाचे ठेकेदार यांनी काम सुरू ठेवल्यास हे काम बंद पाडण्याचा इशाराही या परिसरातील रहिवाशांंनी दिला आहे.