शेकदारमळ्याच्या अंगणवाडीत ‘पोषण मासा’निमित्त गिरविले मनोरंजनातून समाजप्रबोधनाचे धडे !

विविध शासकीय योजनेत सहभागी होण्याचे सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांचे आवाहन
आटपाडी गाव कुपोषण मुक्त करून ‘सही पोषण – देश रोशन’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहभागी व्हा- सरपंच सौ.पाटील
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

‘सही पोषण देश रोशन’ या उपक्रमांतर्गत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर हा कालावधी पोषण महिना म्हणून साजरा केला जातो.
यादरम्यान सदृढ व सशक्त समाज निर्मितीकरिता शाश्वत विकास अंतर्गत कुपोषणमुक्त ग्रामपंचायती मोहिमेअंतर्गत कुपोषण मुक्तीसाठी गरोदर,स्तनदा माता व बालकांना योग्य व पोषक आहार दिला जावा व कुपोषणावर मात करता यावी हा हेतू साध्य करण्यासाठी मातेने मातेची काळजी कशी घ्यावी, यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्या योजनांचा पाठपुरावा व्हावा म्हणून शेकदारमळा आटपाडी येथील आय एस ओ मानांकित अंगणवाडी शाळा येथे अंगणवाडी सेविका,मदतनीस व माता भगिनींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी कुपोषणमुक्त गाव करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे, तसेच ई-पिक नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी समृद्ध गाव, लखपती किसान योजना अशा विविध शासकीय योजनांची माहिती दिली व शासकीय योजनेमध्ये सर्वांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी केले.
आटपाडी गाव कुपोषणमुक्त करण्यासाठी एकात्मिक बालविकास विभागाच्या उबाळे मॅडम व त्यांचा सर्व स्टाफ तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस हे मनापासून करत असलेल्या प्रयत्नाबद्दल सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी त्या सर्वांचे कौतुक केले.
यावेळी महिला बाल विकास विभागाच्या उबाळे मॅडम यांनी पोषण माह उत्साहाने साजरा करण्यासाठी मार्गदर्शन केले.
शेकदारमळा अंगणवाडीच्या सेविका सौ.शोभा माळी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.शेरेवाडी अंगणवाडी सेविका छाया पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात समाज प्रबोधनपर विठ्ठलनाथ भजनी मंडळाच्या सदस्या श्रीमती सुनंदा विश्वनाथ जाधव यांनी त्यांच्या वारकरी नाथसांप्रदाय भूमिकेत लोककलेचा अविष्कार, भारुड सादर करुन कुपोषण मुक्त चळवळीतून प्रबोधन पर ‘भारुड’ सादर केले. तसेच उत्साही युवक युवतींनी ‘पथनाट्याचे’ सादरीकरण करून ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ हा मोलाचा संदेश दिला. उत्साही तरुणांनी आपल्या सादरीकरणातून व देशभक्तीपर गीतातून एकात्मतेचा संदेश दिला व कार्यक्रमाची शोभा वाढविली. उत्साहाचेच एक उदाहरण म्हणजे कुशल बुद्धिमत्तेतून साकारलेला ‘सेल्फी पाॅंईंट’ व त्यामधून मिळालेला संदेश हे आजच्या कार्यक्रमाचे नाविन्य होते.
या कार्यक्रमास अंगणवाडी शेकदारमळा,बिरुबनमळा,गोंदिरा,आटपाडी व दिघंची बीटमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी सहभाग घेतला.शेकदारमळा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील पंच, नानासाहेब माळी,कबीर सर, रविंद्र सावंत व इतर मान्यवर उपस्थित होते. महिला बाल विकास विभागाच्या उबाळे मॅडम,सौ.लाटणे मॅडम,दुर्गा पाटील,मीना फुलारे,मनिषा चांगण,उज्वला शिनगारे, सुनिता शेंडे या अंगणवाडी सेविका व पंचक्रोशीतील माता-भगिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.