
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:
आटपाडी तालुक्यातील हिवतड येथील ऋषिकेश दिगंबर साळुंखे शेतकऱ्यांच्या पीक विम्यासह दोषी ‘राजपथ’ कंपनीवर कारवाईसाठी, दूध भेसळ यासारख्या विविध प्रश्नांची निर्गत लावण्यासाठी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अमर उपोषण सुरु करणार आहेत.
अतिवृष्टी होऊन देखीलही मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांचा डाळिंब,बाजरी,ज्वारी,मका यासारख्या पिकांचा पीक विमा मिळाला नाही.दिघंची ते आरवडे रस्त्याचे काम चालू असताना अनेक अपघात झाले. परंतु या रस्त्याच्या कामाचे ठेकेदार ‘राजपथ’ कंपनीवर कोणतीही कारवाई केली नाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले मिळाले नाहीत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला नाही, दूध भेसळ करणाऱ्यावर कडक कारवाई करावी, या मागण्यांसाठी ऋषिकेश दिनकर साळुंके आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
‘प्रगल्भनायक’शी बोलताना ते म्हणाले की, “शेतकरी बांधवांनी भरलेला पिक विमासुद्धा शेतकर्यांना भेटणार नाही, कारण तशा जाचक अटी आहेत.शेतकऱ्यांचे दुःख हे शब्दात मांडता येत नाही, तर ते प्रत्यक्षात अनुभवावंच लागतं. आज डाळिंब बागा तेल्या रोगामुळे काढून टाकण्याची वेळ आली आहे.बाजरीची तीच अवस्था आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे.निदान शेतकऱ्यांना पिक विमा तरी भेटावा यासारख्या विविध प्रश्नांवर,हक्कासाठी उपोषण करणार आहे.”
ते पुढे म्हणाले की, “शेतकरी नेते अशा परिस्थितीत कुठे आहेत? फक्त ऊस कारखाना सोडला तर बाकी काही प्रश्न नाहीत का? आमदारकी, खासदारकी मिळाली का झालं का सर्व? महाराष्ट्रातील शेतकरी नेते कुठे झोपले आहेत का? काय अवस्था झाली आहे आज माझ्या शेतकरी बांधवांची? महाराष्ट्रातल्या एकापण शेतकरी नेत्याने यावर आवाज उठवला नाही. आम्ही जीवाचं रान करू आणि आमचा हक्क मिळवू ” असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन