पोलीस निरीक्षकांचे नाणे खणाणले, वाळूमाफियांचे धाबे दणाणले!

लाखोंचा मुद्देमाल जप्त,निरीक्षक दिपरतन गायकवाड यांची धडाकेबाज कामगिरी
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माळशिरस:

माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या टीमने अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफियांना मुद्देमालासह पकडले असून या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली असून २६ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील गावच्या हद्दीत सरकारी ओढ्यात अवैध वाळू उत्खनन होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी दि.१३ रोजी माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टिमने छापा मारून वाळू भरलेला एकूण चार ट्रॅक्टर,ट्रॉल्याअसा एकूण २६ लाख ४२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.याठिकाणी अवैध वाळूचे उत्खनन करीत असलेले आरोपी सुखदेव नवनाथ कचरे (रा.कचरेवाडी),शिवाजी भानुदास शिंदे (रा. तिरवंडी),काशिनाथ रामा वाघमोडे (रा. तिरवंडी), सदाशिव दत्तू वाघमोडे (रा. तिरवंडी), विठ्ठल संजय जाधव (रा. तिरवंडी),विकास नवनाथ कचरे (रा. कचरेवाडी) यांना अटक केली आहे.
या आरोपींच्या विरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना दि. १४ रोजी कोर्टात हजर केले असता न्यायालयाने या सहा आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.उर्वरित दोन आरोपी फरार आहेत.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड करीत आहेत.या कारवाईमुळे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व त्यांच्या टिमचे परिसरातून कौतुक होत आहे, मात्र वाळूमाफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.