होतकरुंच्या वाचनालयाला पुस्तकांची प्रतिक्षा!

दात्यांसह सामाजिक संघटनांना मदतीचे आवाहन
गरीब व गुणवंत युवकांनी उभारले वाचनालय !

रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ चांदूर बाजार(अमरावती):

अमरावती तालुक्यातील सावंगा आसरा येथील हुशार पण गरीब युवकांच्या सहभागातून येथील समाज मंदिरात एक वाचनालय उभारण्यात आले.मात्र सर्वांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे या वाचनालयात ते पुस्तके उपलब्ध करू शकले नाहीत. त्यामुळे हे वाचनालय अद्याप पुस्तकांच्या प्रतीक्षेत आहे. सावंगा आसरा या खेडेगावातील १५ ते २० युवकांनी एकत्र येऊन येथील समाज मंदिरामध्ये आपापल्यापरीने वाचनालय सुरू केले. तसेच काही प्रमाणात ग्रंथ स्पर्धापरीक्षा पुस्तके विकत घेणे सुरू केले. मात्र स्पर्धा परीक्षा तसेच अन्य विषयांच्या महागडे पुस्तके घेणे शक्य नसल्यामुळे मोजक्याच पुस्तकांतून अभ्यास सुरू आहे. त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी काही दानदात्यांनी पुढे यावे, अशी अपेक्षा सदर युवक करीत आहे. काही युवकांचे आई-वडील भूमिहीन असून,काही लोकांकडे अत्यल्प शेती आहे.त्यामध्ये त्यांच्या कुटुंबाचासुद्धा खर्च भागत नसल्यामुळे शिक्षण पूर्ण करावे कसे? हा प्रश्न त्या युवकांसमोर आ वासून उभा आहे. युवकांनी मोठ्या परिश्रमातून हे छोटेखानी वाचनालय सुरू केले असले,तरी पुस्तकाअभावी ते केवळ शोभेची वास्तू होऊ नये,अशी भीती त्यांच्या पालकांनीही व्यक्त केली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील दानदाते तसेच स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घेतला तर आमच्या वाचनालयालाही स्पर्धा परीक्षा पुस्तक तसेच अन्य साहित्याची मदत होईल,अशी विनवणी युवकांकडून होत आहे.