बिबट्या नव्हे तो..! ,तरसाचे माग!

बिबट्या नव्हे तो..! अंधारात भासला पट्टेरी वाघ(?)
वन विभागाला आढळले तरसाचे माग!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची,आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील पुजारवाडी(दि) परिसरात शुक्रवारी रात्री अंधारात दर्शन घडलेला प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचा स्पष्ट निर्वाळा वनविभागाने दिला आहे.त्यामुळे बिबट्याच्या अफवेची नागरिकांनी मनातील भीती काढून टाकावी,असे आवाहन करण्यात आले आहे.वन विभागाचे वनक्षेत्रपाल ए.डी.खाडे,वनरक्षक ए.के.खापरकर,वनपाल बी.पी.बालटे,पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे,ब्रह्मदेव व्होनमाने आदींनी तातडीने परिसराला भेट दिली.
आटपाडी तालुक्यातील दिघंची नजीकच्या पुजारवाडी परिसरातील टिंगरेवस्ती भागात रात्री अमोल उजना पुजारी व संग्राम संजय पुजारी हे चुलते-पुतणे दिघंची येथून गणपती स्‍थापनेसाठी गणेशमूर्ती घेऊन घराकडे निघाले होते.टिंगरेवस्ती येथील घराजवळ ओढापात्र ओलांडून दोघेजण पुढे आले असता रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ऊसाच्या एका फडातून दुसऱ्या फडामध्ये पट्टेरी वाघ(?)सदृश्य प्राण्याने उडी मारल्याचे त्यांना जाणवले.हे दृश्य पाहताच त्यांनी रात्री अंधारात भयभीत होऊन घराकडे वेगाने मोटारसायकल हाकली.याबाबतची माहिती उपस्थितांना सांगितली.त्यामुळे बिबट्याचा संशय घेऊन परिसरात वरचेवर शंभर ते दोनशे लोकांनी कुतूहलापोटी उपस्थिती लावली.
वन विभागाचे वनक्षेत्रपाल ए.डी.खाडे,वनरक्षक ए.के.खापरकर, वनपाल बी.पी.बालटे व त्यांचे इतर कर्मचारी यांनी या भागात तातडीने भेट दिली.संबंधित प्राण्याबाबत अस्तित्वाच्या खाणाखुणा पडताळल्या.त्यांनी हे दृश्य अनुभवणाऱ्यांना तरस, वाघ व बिबट्याचे फोटो दाखविले.मात्र त्यांना रात्रीच्या अंधारात दिसलेला प्राणी पट्टेरी असल्याचे जाणवले होते.
या परिसरात तरस या प्राण्याचे लोकांना वारंवार दर्शन घडते.त्यामुळे या परिसरात तरसाच्या पायांचे ठसे मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.मात्र बिबट्या असल्याचा कोणताही पुरावा किंवा ठसा अद्याप आढळलेला नाही.तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे नेमका प्राणी कोणता हे सांगणे कठीण झाले आहे.
दर्शन घडलेला प्राणी तरस असल्याचा स्पष्ट निर्वाळा वन विभागाने दिला आहे.या परिसरात बिबट्या नसून तसे त्याचे कोणत्याही प्रकारचे ठसे किंवा अस्तित्वाच्या खुणा नाहीत,असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये,मात्र सतर्क रहावे असे आवाहन केले आहे.पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनीही आपल्या टीमसह परिसराला भेट दिली.पोलिस प्रशासनानेही घराबाहेर झोपू नये, काळजी घ्यावी असे आवाहन केले होते.