वीज कनेक्शन पूर्ववत जोडण्याच्या तयारीनंतर ‘स्वाभिमानी’ ‘शांत’!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ तासगाव :
थकीत वीज बीलधारक शेतकऱ्यांची कनेक्शन तोडण्याची मोहीम तासगाव तालुक्यात सुरू करण्यात आल्याच्या निषेधार्थ बुधवारी तासगाव महावितरण कार्यालयावर धडक देण्यात आली.तोडलेली कनेक्शन जोडण्याची तयारी अधिकाऱ्यांनी दाखविली. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र सुरूच राहिली तर सांगलीच्या महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.
वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रान्सफॉर्मरवरील वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लावला होता. त्यामुळे शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. मतकुंनकी, तासगाव, धुळगाव, मांजर्डे, आरवडे, सावळज, वायफळे आदींसह अन्य गावातील ट्रान्सफॉर्मरवरील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे जनावरांनाही पाणी मिळणे अवघड झाले होते. त्यामुळे बुधवारी जिल्हाध्यक्ष महेश खराडे तालुका अध्यक्ष दामाजी दुबल, युवा आघाडी अध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव यादव, संदीप शिरोटे, शिवाजी पाटील, सूरज पाटील,पोपट उपाध्ये, आशिष पाटील, शाम पवार, समीर तांबोळी, वसंत उपाध्ये, कुमार माळी, अमोल गव्हाणकर, मोहन पाटील, चंद्रकांत शिंदे आदींसह शेतकरी तासगाव येथील महावितरण कार्यालयात जमले. त्यांनी अभियंता भारत व्हणमाने, एस.डी.मुल्ला आदींची भेट घेतली. त्यांना महेश खराडे यांनी वस्तुस्थिती सांगितली. वीज कनेक्शन जोडा, तरच इथून हलणार! अशी भूमिका घेतली.तसेच वीज बिल भरण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्या, टप्पे पाडून द्या,अशी भूमिका मांडली.अधिकाऱ्यांनीही त्याला तयारी दर्शविली.तात्काळ सर्व ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी सुदाम पाटील, नवनाथ पाटील,भीमराव पाटील,अकिब मुजावर, चैतन्य पाटील ,गजानन पाटील, आदीसह शेतकरी उपस्थित होते.