चला रे, चला ! बाजाराला चला !!

आटपाडीत शेळ्या-मेंढ्यांचा बाजार भरला!
भाजीपाला व इतर दुकानेही होऊ लागली दाखल!
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:

बाजार बंदीनंतर आता प्रशासनाने आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी दिल्यामुळे आटपाडी येथील शेळ्यामेंढ्यासह भाजीपाला व इतर दुकाने थाटून नियमितपणे भरत असलेल्या आठवडा बाजाराला आजपासून सुरुवात झाली आहे.बाजार पटांगणातील आवारात भरणाऱ्या बाजारात दुकाने व स्टॉल सकाळपासून दाखल होऊ लागली आहेत.
कोरोना प्रादुर्भावाचे अनुषंगाने प्रशासनाने बाजार भरवण्याचे बंद केले होते. परंतु आता १९ ऑगस्टपासून आठवडा बाजार भरवण्यास परवानगी मिळाली आहे. शनिवारी आटपाडीचा बाजार परंपरेप्रमाणे भरवला जातो. बरेच दिवस बंद असलेला हा बाजार आज सुरू झाला आहे.
सकाळी-सकाळी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेळी-मेंढी पालकांनी आपल्याकडे विक्रीसाठी असलेल्या शेळ्या-मेंढ्या दाखल केल्या आहेत, तर दूरवरून व्यापारीवर्गानेही उपस्थिती लावली आहे. बऱ्याच दिवसानंतर शेळ्या-मेंढ्यांचा हा बाजार भरत असल्यामुळे त्यांच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होत असल्याचे चित्र बाजारात निर्माण झाले आहे.अनेक दिवसांच्या खंडानंतर आज शेळ्या-मेंढ्यांचा पहिलाच बाजार असल्यामुळे बाजारात अपेक्षेप्रमाणे शेळ्या-मेंढ्याचे वाण दाखल झाले नव्हते.पशुधन सजवण्यासाठी आवश्यक असणारे चाळ,घुंगरे,पट्टे यांची दुकाने तसेच आवारात मांडण्यात येत असलेली चप्पलांची दुकाने लागली आहेत.
याचबरोबर आटपाडीच्या आठवडा बाजारात भाजीपाल्यासह अन्य विक्रेतेही दाखल झाले आहेत. सकाळी-सकाळी त्यांनी आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली आहे.परगावाहून भाजीपाला व्यापारी व अन्य विक्रेते आपल्या वाहनांद्वारे दाखल होऊ लागले आहेत.आटपाडीचा बाजार सकाळी फुल्ल असतो. त्याचबरोबर तो दिवसभरही फुल्ल राहतो, हे त्याचे वैशिष्ट्य आहे.शेळ्या-मेंढ्यांच्या आवकेमुळे लोक लवकर आलेले असतात.ते मार्केट यार्डातील बाजारात शेळ्या-मेंढ्यांच्या खरेदी-विक्रीनंतर बाजार पटांगणातील बाजारात हजेरी लावून बाजार करूनच जातात.त्यामुळे सकाळी गर्दी असते, तर आजूबाजूच्या परिसरातील लोक आपल्या सवडीनुसार बाजाराला जातात. त्यामुळे आटपाडीचा बाजार पटांगणातील बाजार सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरलेला असतो.आज त्याचा बऱ्याच दिवसानंतरचा पहिला दिवस आहे. त्याचमानाने त्याच प्रतिसादही आहे.