‘वाघ्या’ची कोब्रा नागाशी झुंज !

भटक्या कुत्र्याने वाचवले बाळांचे प्राण!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /पुणे :

पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका भटक्या कुत्र्याने आपला जीव धोक्यात घालून बागेत खेळणाऱ्या काही लहान मुलांचे जीव वाचविले. या कुत्र्यानं शेवटपर्यंत कोब्रा या विषारी नागाशी झुंज दिली.
भटक्या कुत्र्यांचा अनेक नागरिकांना त्रास होत असतो. अशा भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नागरिकांकडून अनेकदा मागणी केली जाते. पण पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील एका भटक्या कुत्र्याने आपला जीव धोक्यात घालून बागेत खेळणाऱ्या काही लहान मुलांचे जीव वाचविले आहेत. अचानक कंपाऊंडमध्ये शिरून बागेत खेळणाऱ्या मुलांच्या दिशेनं जाणाऱ्या एका कोब्रा जातीच्या नागाला एका भटक्या कुत्र्यानं रोखून धरल्याची घटना घडली आहे. या कुत्र्याने विषारी कोब्राशी अखेरपर्यंत झुंज देत त्याचा फडशा पाडला आहे.पण कोब्राने दोनवेळा दंश केल्याने कुत्र्याचा मात्र मृत्यू झाला. चिमुकल्यांना विषारी कोब्रा जातीच्या नागापासून वाचवणाऱ्या या भटक्या गावठी कुत्र्याने मायाळूपणाचा कळस करीत स्वतःचा प्राण मात्र गमावला.