

रक्षाबंधन उरकून परतताना अपघातात भावावर काळाचा घाला!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /पैठण :
आपल्या बहिणीकडे रक्षाबंधन उरकून रविवारी घराकडे परत निघालेल्या भावाला भरधाव इंडिकाने पाठीमागून धडक दिल्यामुळे भावाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पैठण तालुक्यात घडली. कल्याण अंबादास सोळुंके (वय ३१, रा.अंबड जि.जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या भावाचे नाव असून ही बातमी समजताच बहिणीने एकच टाहो फोडला.
कल्याण हा रक्षाबंधन सणानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथे बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेला होता.रक्षाबंधनाचा पवित्र व भाऊ-बहिणीच्या नात्यातील गोडवा निर्माण करणारा सण उरकुन रविवारी तो दुचाकीवरून अंबड या आपल्या गावाकडे परत निघाला होता.
औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा (ता.पैठण) या गावाजवळ आला असताना त्याच्या दुचाकी गाडीला (क्रमांक एम एच २० एफ एफ ०४८३) पाठीमागून आलेल्या इंडिका कारने (क्रमांक एम एच २१ व्ही ७२६५) ने पाठीमागून जोरदार धडक दिली.
या जोराच्या धडकेने दुचाकी लांबपर्यंत उडून कोसळली. त्यामध्ये कल्याण डोक्यावर आदळल्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती नागरिकांनी पाचोड पोलिसांना कळवली. अपघातग्रस्त अवस्थेत कल्याणला टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. सकाळी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
रक्षाबंधनसाठी मोठ्या उत्साहात आलेल्या कल्याणच्या हातावर बांधलेली राखी त्याच्या आयुष्यातील शेवटचे राखी ठरली. भावाच्या निधनाची वार्ता समजताच बहिणीने एकच टाहो फोडला. ते पाहून उपस्थितांना देखील अश्रू आवरता आले नाहीत. मयत कल्याण यास पत्नी व दोन लहान मुली असा परिवार असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती