नीरा उजवा कालव्याचे माळशिरस व माचणूर उपविभाग कार्यालय बंद पडण्याच्या मार्गावर!

बळीराजा हवालदिल
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

अपुरे अधिकारी,अपुरा कर्मचारी वर्ग त्यातच बरेचशे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत असून उरलेसुरले अधिकारी व कर्मचारीही बदलीने दुसरीकडे निघून जात असल्याने माळशिरस येथील निरा उजवा कालवा विभागाचे माळशिरस व माचणूर उपविभाग ही कार्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.यामुळे सिंचन व्यवस्थापनावर परिणाम झालेला असून लाखो शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार आहेत. मात्र याकडे प्रशासनाबरोबर राज्यकर्त्यांनीही ढुंकूनही न पाहिल्याने बळीराजा मात्र हवालदिल झालेला दिसून येत आहे.
नीरा उजवा कालव्यावर खंडाळा, फलटण,माळशिरस,पंढरपूर व सांगोला असे पाच तालुक्यातील लाभ क्षेत्र अवलंबून आहे. माळशिरस येथील माळशिरस व माचणूर असे 2 उपविभाग करण्यात आले आहेत. नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या एकूण लाभ क्षेत्रापैकी 60 टक्के सिंचन क्षेत्र हे माळशिरस व माचणूर या दोन उपविभागात येत आहे. याचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन्ही विभागाला एक, एक उप अभियंते व प्रत्येक विभागांतर्गत चार, चार शाखा अशा एकूण 8 शाखा करण्यात आलेले आहेत.या प्रत्येक शाखेला एक एक असे 8 शाखाधिकारी असतात व एका शाखा अधिकाऱ्याकडे 15 गावे असतात.
असे असताना प्रत्यक्षात मात्र माळशिरस उपविभागाला एक उपअभियंता असून माचणूर विभागाला एकही उपअभियंता नाही. इतर ठिकाणच्या उपअभियंत्याकडे माचणूर उपविभागाचा अतिरिक्त कार्यभार आहे.तर माळशिरस उपविभागाला 4 शाखा अधिकाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात मात्र 1 कार्यरतआहे. माचणूर उपविभागाला तर 1 शाखाधिकारी 60 गावांचा कारभार पहात असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे .
दोन्ही विभागाला 2 उपअभियंते व 8 शाखाधिकारी असे एकूण 10 अधिकाऱ्यांची गरज असताना प्रत्यक्षात मात्र त 3 जणांच्या खांद्यावर ओझे असल्याने सिंचन व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होत असून लाखो शेतकरी पाण्यापासून वंचित तर राहणार आहेतच पण याचबरोबर शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडणार असून याचा त्वरीत दखल घेणे गरजेचे आहे प्राचीनकालीन ही सिंचन प्रणाली सुरुळीत चालू ठेवायची असल्यास त्वरित या कार्यालयांमध्ये पूर्ण क्षमतेने अधिकारी व कर्मचारी वर्ग रुजू करणेबाबतची प्रतिक्रिया जनसामान्यांमधून व्यक्त केली जात आहे.
“माळशिरस व माचणुर उपविभागा अंतर्गत अपुरे अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे सिंचन व्यवस्थापनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून लवकरच संबंधित अधिकारी व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत बैठक आयोजित केली असून माळशिरस व माचणूर उपविभागातील अधिकारी व शाखा अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरून होणारे संभाव्य नुकसान टाळले जाईल.”
-आ.राम सातपुते,माळशिरस