“पदरचं टुकडं खावून गाढवावनी वझी व्हायली, रुपाया न्हाय दिला!”

माळशिरस तालुक्यातील शासकीय धान्य गोदामातील हमाल व मुकादमांची आर्थिक दैना! काम बंद आंदोलन सुरु!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :

माळशिरस तालुक्यातील अकलुज, माळशिरस व नातेपुते येथील शासकीय धान्य गोदामात केलेल्या कामाची कोविड १९ मधील बिले मिळाली नसल्याने शासकीय हमाल व त्यांचे मुकादम यांची आर्थिक दैना सुरू आहे.थकीत बिले न मिळाल्याने कामगारांनी १७ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
माळशिरस येथील शासकीय धान्य गोदामातील मुकादम व हमाल ज्ञानदेव किसन पिसे,नितीन पोपट पिसे,विकिराज शिवाजी पिसे,सौरभ संतोष पिसे,संदीप ज्ञानदेव पिसे,किसन श्रीमंत पिसे आदी कामगारांनी मिळून उपजिल्हाधिकारी पुरवठा विभाग सोलापूर यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, अकलुज, माळशिरस व नातेपुते गोदामाचे मुकादम तसेच हमाल यांचा पगार हा २०२० मध्ये कोविड १९ ची मोफत धान्याची हमाली एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत केलेली आहे. तसेच फेब्रुवारी- मार्च, एप्रिल व मे महिन्यातील हमाली २६० दिवसांची आहे.नियमित केलेल्या हमाली कामाची बिले आजतागायत मिळालेली नाहीत.यामुळे सर्वांवर उपासमारीची वेळ आलेली असताना कार्यालयाकडून कामाचे बिले मिळणेबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
उपजिल्हाधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालुन बिले मिळणेची हमी घ्यावी व बिले मिळणेची तजवीज करावी. श्रीराम मागासवर्गीय हमाल कामगार मजुर सहसंस्था मर्या. अक्कलकोटचे चेअरमन चवडाप्पा गुराण्णा यारोळे यांच्याकडून बिले काढण्याचा आदेश मिळावा. यापूर्वी वरिष्ठांकडे बिलाची वारंवार मागणी केली होती. परंतु संबंधितांनी त्याकडे कानाडोळा केला असल्यामुळे पोटासाठी कष्टाचे काम करूनसुद्धा उपासमारीची वेळ आमच्या कुटुंबावर आलेली आहे. स्वतः लक्ष घालुन बिले मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. आम्हाला आमची बिले वेळेत न मिळालेस आमचेवर आत्महत्या करणेची वेळ येईल.तशी आमच्यावर वेळ येऊ नये याची काळजी घेऊन आपण आमची बिले मिळावीत अशी व्यवस्था करावी, अशा आशयाचे निवेदन उपजिल्हाधिकारी सोलापूर ,प्रांत अधिकारी अकलूज,सोलापूर,तहसीलदार माळशिरस यांना देण्यात दिलेक.
जोपर्यंत कामगारांचे पगार होत नाही,तोपर्यंत काम बंद राहणार!
अकलूज ,नातेपुते ,माळशिरस येथील गोडाऊनचे काम बंद म्हणजे बंद! जोपर्यंत शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार होणार नाहीत, तोपर्यंत कुठलेही काम करणार नाही आणि करूही देणार नाही, असा इशारा हमाल माथाडी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिला आहे.