आदेश डावलून शर्यत घेतल्यास कारवाई करणार: प्रांताधिकारी संतोष भोर

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला बंदी घातलेली असताना आदेश डावलून या शर्यती घेतल्यास संयोजक व आयोजकांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा खानापूर विभागाचे उपविभागीय अधिकारी संतोष भोर यांनी आटपाडी येथील बैठकीत दिला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी झरे दिनांक २० ऑगस्ट रोजी छकडा गाडी शर्यतीचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले आहे. यावरून महाराष्ट्रामध्ये मोठा गाजावाजा होत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.असे असतानाच प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून आटपाडी येथे बैठक घेत त्यांना निमंत्रित केले होते.मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी या बैठकीला आपला प्रतिनिधी पाठवला होता.उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे,तहसीलदार बाई माने, नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे,सरपंच, पोलीस पाटील, तलाठी या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी संतोष भोर म्हणाले,बैलगाडी शर्यतीला न्यायालयाने बंदी घातलेली आहे.त्यामुळे अशा शर्यती आयोजित करणे कायद्याचा भंग आहे. त्यामुळे या शर्यती आयोजित करू नयेत असे आवाहन केले. कायद्याचे उल्लंघन करून जर या शर्यतीचे आयोजन केले तर संयोजक व आयोजकावर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल.
तसेच covid-19 प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कलम १४४ लागू असल्यामुळे तरुणांनी व लोकांनी गर्दी करू नये,अन्यथा खटले दाखल करण्यात येतील. तरुणांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आपले आयुष्य बरबाद करु नये. तसेच या छकडा गाडी शर्यतीच्या पार्श्वभूमीवर झरे व पंचक्रोशीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.आजपासूनच झरे परिसरात नाकाबंदी व संचारबंदी करण्यात आली आहे.
माणदेशासह परिसरात खिल्लार जनावरांंची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. येथील शेतकरीवर्ग त्याचे संगोपन करून ही प्रजात जतन करीत आहे. चपळाईच्या वैशिष्टपूर्ण गुणामुळे पुढे याचा वापर शर्यतीसाठी होऊ लागला. त्यामुळे या जनावरांना शर्यतीसाठी मोठी मागणी होऊन पशुपालकाचे अर्थकारण सुधारू लागले. मात्र काही पशू-प्रेमी संघटनांनी याबाबत याचिका दाखल करून जनावरांना होणाऱ्या यातनांचा विचार करून या शर्यतीवर बंदी घालण्यात आली. न्यायालयाने बंदी आदेश पारित केले. परिणामी या पशुधनाची मागणी घटून पशुपालकाचे अर्थकारण बिघडले.आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत विचार करून या शर्यती सुरू करण्याबाबतचा हालचाली सुरू केल्या व २० ऑगस्ट रोजी झरे येथे छकडा गाडी शर्यतीचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून ही बैठक आयोजित केली.