अमावस्येला मुचंडी दऱ्याबाजवळ उसळली गर्दी !

कोरोना नियमांची पायमल्ली! तिसऱ्या लाटेला आमंत्रण? प्रशासनाची डोळेझाक!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री.दरेश्वर देवाच्या दर्शनासाठी रविवारी अमावस्येला हजारो भाविक भक्तांची गर्दी केली होती व कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडविले होते.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरील श्री. दरेश्वर देवाचे दर्शनासाठी रविवारी दूरदुरून भाविक भक्त आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनातून येताना दिसत होते.मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. जिकडे नजर जाईल तेथे भाविक दिसत होते.
दरेश्वर देवाच्या मंदिरासमोर असलेल्या ओढापात्रातील पाणी खळखळून वाहताना दिसत होते.भाविक भक्त या ओढ्यातील वाहत्या पाण्यात पाय धुऊन दरेश्वर व जक्कमादेवीच्या दर्शनासाठी रांगेने उभे होते. यावेळी भक्त लोकांना कोरोनाचे गांभीर्य दिसत नव्हते.
भक्तांकडून कोरोनाचे कोणत्याही नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. सामाजिक अंतर ठेवणे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर हे सर्व उपाय बासनात गुंडाळून ठेवल्याचे पहावयास मिळत होते.मंदिर परिसरात आज अमावस्या असल्याने जत्राच भरली होती .नारळ विक्रेते, मेवा मिठाईची दुकाने, व अन्य व्यावसाईक यांच्यामुळे मंदिर परिसर गजबजून गेला होता. चढ्या भावाने हे व्यावसाईक आपल्या मालाची विक्री करताना दिसत होते.
रविवारी मोठी अमावस्या असल्याने देवाच्या दर्शनासाठी भक्तानी मोठी गर्दी केली होती. विशेष बाब म्हणजे दरेश्वर देवाचे मंदिर हे कर्नाटक राज्यात आहे.तर दरेश्वर देवाची बहिण जक्कमादेवीचे मंदिर हे ओढापात्रातील डोहात महाराष्ट्र राज्यात आहे.कर्नाटक राज्यातील कनमडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व कर्नाटक सरकारचेवतीने या मंदिर परिसरात विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंदिर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटक पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी असतात हे या देवाचे वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
रविवारी श्री. दरेश्वर देवाचा वार तसेच अमावस्या असल्याने भाविक भक्त हजारोंच्या संख्येने दर्शनासाठी येत जात होते.परंतु ओढापात्रातील श्री. जक्कमादेवीच्या दर्शनाचा लाभ भाविक भक्तांना मिळत होता.
परंतु श्री. दरेश्वर देवाच्या दर्शनासाठी भाविक भक्त मंदिराच्या चढ्या पाय-या चढून वर गेल्यावर देवाचे दर्शन बंद केल्याचे लक्षात येऊन भाविकांना निराश होऊन परतावे लागत असल्याने भाविक गोंधळून जात होते.
अमावस्या असल्याने भाविकांनी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण दिले जात असल्याची चर्चा तालुक्यात सुरू होती.