रस्ता व पीक विम्यासाठी उपसरपंचाचे आमरण उपोषण

चौथा दिवस;गणोजा गावात पूलाची मागणी व पिक विमा लाभार्थ्यांना विम्याचा लाभ लवकर मिळण्याची मागणी
रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/अमरावती- चांदूर बाजार (कृष्णापुर) :

चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी ग्रामपंचायतचे उपसरपंच प्रेमदास गजभिये हे गणोजा गावातील मुख्य रस्ता व पाणंद रस्त्यासाठी व चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ,बेलोरा, आसेगाव पूर्णा महसूल मंडळातील पिक विमा धारक शेतकऱ्यांना सन 2020-21 च्या विम्याचा तात्काळ लाभ देण्यात यावा यासाठी चांदूरबाजार तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत.उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.
गणोजा गावाच्या अडीच किलोमीटर मुख्य रस्त्याची १० वर्षापासून अतिशय दुर्दशा झाली असून त्या रस्त्यावर बरेचसे जीवघेणे अपघात झाले आहेत. या रस्त्याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाने नेहमी दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपसरपंचांनी दोन वर्षांपूर्वीही तहसील कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले होते. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार, गटविकास अधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्ता नूतनीकरणाचे लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडविले होते.
गणोजा-आष्टोली पाणंद रस्त्याची चार वर्षात दुर्दशा झाली आहे. या रस्त्याला गावातील नाला आडवा जात असल्याने या ठिकाणी पूल बांधणे अत्यावश्यक होते. तेथे पूल न झाल्याने या मार्गावरील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याही रस्त्याची दुरुस्ती व पुलाची मागणी पूर्ण झालेली नाही. गणोजा हे गाव सोनोरी ग्रामपंचायतमध्ये विलीन आहे. हे गाव ग्रामपंचायतच्या एका प्रभागाचा अर्धा भाग आहे. येथे कायमस्वरूपी ठोस उपायोजना करण्यात याव्यात. तसेच तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ,बेलोरा, आसेगाव पूर्णा पिक विमाधारक शेतकऱ्यांना सन 2020-21विम्याचा तात्काळ लाभ मिळावा अशी मागणीही उपोषणकर्ते प्रेमदास गजभिये व नागरिकांनी केली आहे. नागरिकांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.