आटपाडीत डॉ.शंकरराव खरात यांच्या नावे ‘हॉस्पिटल- स्मारक’ उभारावे: स्नेहजित पोतदार

आटपाडीत थोर साहित्यिक डॉ.शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या नावे ‘हॉस्पिटल- स्मारक’ उभारावे: स्नेहजित पोतदार यांचे आमदार अनिल भाऊ बाबर यांना निवेदन
नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

थोर साहित्यिक डॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे त्यांच्या नावे अत्याधुनिक ‘हॉस्पिटल- स्मारक’ उभा करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष स्नेहजित पोतदार यांनी आमदार अनिलभाऊ बाबर यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, आटपाडीचे सुपुत्र, थोर साहित्यिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घटनेचे शिल्पकार,मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, आपल्या पत्नीला व मुलाला वैद्यकीय शिक्षण देणारे द्रष्टे समाजसेवक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी डॉ. शंकरराव खरात यांची जुलै 2021 पर्यंत जन्मशताब्दी आहे. त्यानिमित्त त्यांचे जन्मगाव आटपाडी येथे त्यांच्या नावे भव्य असे शंभर ते दोनशे पेक्षा जास्त क्षमतेच्या कॉटेजचे अत्याधुनिक व अद्यावत ‘हॉस्पिटल- स्मारक’ विशेष बाब म्हणून मंजूर करावे. त्याची सर्व ती पूर्तता व्हावी,यासाठी तातडीने राज्य शासनाकडे पाठपुरावा व्हावा, अशी मागणी आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडे केली आहे.
याबाबत शासनाकडे पूर्तता करण्याचे आश्वासन आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिले. यावेळी डॉ.एम वाय.पाटील, डॉ.विनय पत्की, डॉ.उमाकांत कदम,डॉ.श्रीनाथ पाटील,डॉ.अनिरुद्ध पत्की, डॉ.जयंत बापट,अॅड. धनंजय पाटील,तानाजीराव पाटील, सरपंच सौ.वृषाली पाटील, साहेबराव पाटील, उपसरपंच प्रा.डॉ.अंकुश कोळेकर, उमाकांत देशमुख, बाळासाहेब मेटकरी, धनंजय सुतार, गणेश टोणे व डॉक्टर उपस्थित होते.