पाण्यात बुडणाऱ्या तिघांना वाचवले… पण थकून त्राण गेल्याने स्वतः मात्र प्राण सोडले!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/अहमदनगर:
धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेले अहमदनगर शहरातील तीन युवक पाण्यात बुडत असताना वाचवणाऱ्या मयूर परदेशी या तरुणाचा दमछाक होऊन अंगात त्राण न राहिल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तिघांना वाचविल्यानंतर पाण्याबाहेर येताना स्वतःचा मात्र त्याने जीव गमावला.
अहमदनगर शहरातील युवक धबधब्यावर पोहोण्यासाठी गेले होते.यातील तीन युवक पाण्यात पोहत असताना तिघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते धबधब्यातील पाण्यात बुडू लागले. हा प्रकार तेथे उपस्थित असलेला तरुण महेश परदेशी याने पाहिला. क्षणाचाही विलंब न लावता व कशाचाही विचार न करता तो धबधब्यात उतरला. एक-एक करून त्याने तिघांनाही पाण्याबाहेर काढले. तिघांना पाण्याबाहेर काढताना पाण्याच्या प्रवाहामुळे मयूर परदेशी खूप थकून त्याच्या अंगात त्राण राहिले नाही. धबधब्याच्या काठावर येईपर्यंत त्याला धाप लागू लागली. त्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
तिघांना वाचवणारा महेश बुडत असताना तेथे उपस्थित असणारे सर्वजण पाहत होते. त्यांनी आरडाओरडा केला. काही युवक मदतीसाठी धबधब्यात उतरले. परंतु महेशजवळ पोहोचेपर्यंत तो पाण्यात बुडाला होता. त्याला पाण्यातून बाहेर काढून दवाखान्यात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तिघांना वाचवणाऱ्या या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.