‘प्रगल्भनायक’च्या दणक्याने माळशिरस पश्चिम भागातील रस्त्याची तातडीने दुरुस्ती सुरु !

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

‘प्रगल्भनायक’च्या दणक्याने जाधववाडी-इस्लामपूर-मानकी या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीला
लगेचच दुसऱ्यादिवशी सुरुवात केली. अनेक दिवस या रस्त्यालगत खडी पडली होती. परंतु ती दुरुस्त करण्याचे धाडस प्रशासन करत नव्हते. दिनांक 26 मे रोजी ‘माळशिरस पश्‍चिम भागातील दयनीय रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी’ या शीर्षकाखाली आलेल्या बातमीच्या दणक्याने दुसऱ्याच दिवशी तातडीने खड्डे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली.
या रस्त्यातून माळशिरसला शासकीय कामासाठी भांब,गिरवी,कन्हेर,सरगरवाडी,इस्लामपूर,माणकी या गावातील ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना या रस्त्याने धान्य विकण्यासाठी,ऊस नेण्यासाठी या रस्त्याची अत्यंत गरज आहे. शिवाय इस्लामपूर ते जाधववाडी हा रस्ता गेल्या वर्षी जानेवारीत पूर्ण झाला.परंतु या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून ठेकेदाराने खड्डे बुजवण्यासाठी रस्त्यावर ती खडी टाकूनसुद्धा दोन महिने झाले,परंतु दुरुस्ती झाली नाही.गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या रस्त्याने देशाचे नेते शरदचंद्र पवार, पालकमंत्री दत्तामामा भरणे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कन्हेर या ठिकाणी भेट दिली होती. त्यानिमित्ताने तरी रस्ता दुरुस्त होईल अशी आशा होती. परंतु सुस्त प्रशासनाला कसलीही जाग आली नाही. कन्हेर चौकी ते सदाशिवनगर हाही रस्ता रहदारीचा असून गेली अनेक वर्ष या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मोठमोठे खड्डे आहेत. यावर्षी सदाशिवनगर कारखाना चालू झाला तर या रस्त्याने फार मोठी कसरत करावी लागेल, म्हणून या भागातील जनतेची माळशिरस तालुक्याला दोन आमदार व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाखांचे मताधिक्य दिल्याने तालुक्यातील ही कामे मार्गी लागतील,अशी आशा सर्वसामान्य जनतेमधून व्यक्त केली जात होती. पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त व्हावेत,अशी या गावांच्या सरपंचाची मागणी होती.
नागरिकांच्या या प्रश्नावर ‘प्रगल्भनायक’ने प्रकाशझोत टाकला होता. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच लगेच दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात करण्यात आली. नेते बाळासाहेब सरगर यांनी ‘प्रगल्भनायक’च्या या कामाचे आभार मानले.