लोकांनी ‘त्या 2R आमदारांचं’ तोंड भरून कौतुक केलं!

मोटेवाडी ग्रामीण मार्गांचा होणार कायापालट,रस्ता कामासाठी वाढीव निधी

संजय हुलगे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:

माळशिरस तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टी व साखर कारखान्याच्या वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांना जागोजागी खड्डे पडले होते.यामुळे रस्त्याचा प्रश्न मोठा अडचणीचा बनला होता.यासाठी आपापल्या भागातील नागरिकांनी आमदार राम सातपुते व विधानपरिषदचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याकडे गाऱ्हाणे ऐकवले होते.त्यासाठी नागरिकांनी कागदपत्रांचा पाठपुरावा आमदारांकडे केला होता.त्या प्रयत्नाला लॉकडाऊनची परिस्थिती असतानाही यश आले आहे. यामुळे अनेकांनी आमदारांचे तोंडभरून कौतुक केले आहे.  राम सातपुते यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील ग्रामीण मार्गांना नवीन चकाकी येणार आहे. जिल्हा वार्षिक वर्गणीतून 30/54 व 50/54 या योजनेतून माळशिरस मधील ग्रामीण मार्गांना राम सातपुते यांच्या प्रयत्नाने 1 कोटी 32 लाख रुपये मंजूर झाले होते.या कामाच्या योजनेतून मोटेवाडी (मा) या गावाला 14 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता.मोटेवाडीतील बालाजीनागर रस्ता-ज्ञानदेव कोळेकर वस्ती-पंढरी वायदंडे वस्ती-खरात वस्ती-पिलीव रोड या कामासाठी 14 लाख रुपयांचा निधी मिळाला होता.परंतु अतिवृष्टीमुळे झालेले रस्त्याचे नुकसान व रस्त्याचे दर्जेदार काम करण्यासाठी आहे हा निधी अपुरा पडत असल्याने तो निधी वाढवून मिळावा अशी विनंती मोटेवाडीचे भाजपा युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष प्रा.दादासाहेब खरात यांनी आमदार राम सातपुते यांच्याकडे केली होती.त्यासाठी जास्त निधीची कशी गरज आहे हे त्यांनी कागदपत्रासाहित आमदार सातपुते यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्यांच्या प्रयत्नांना यश भेटले आहे.
 आमदार सातपुते यांच्या प्रयत्नाने गावातील या रस्त्यासाठी सहा लाख रुपयांचा वाढीव निधी मिळाला आहे,अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष  प्रा.दादासाहेब खरात यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली .वाढीव निधीमुळे एकूण 20 लाख रुपयांचा निधी मोटेवाडी गावाला मिळाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.यामुळे रस्त्याच्या कामातून मोटेवाडीचा येणाऱ्या काळात चेहरामोहरा बदलणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.