
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
आपला पोलिसी खाक्या बाजूला ठेवून सर्वांशी समजूतदारपणाने वागणारा, सर्वांना आपलासा वाटणारा,शांत व मनमिळावू पोलीस अधिकारी जतचे पोलीस निरीक्षक उत्तम मधुकर जाधव यांचा कोरोनाने आज पहाटे कोरोनाने बळी घेतला. सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलिस प्रशासनासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम मधुकर जाधव (वय वर्ष 52, रा.सौंदरी ता. बार्शी जि.सोलापूर) यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्यांनी सोलापूर ग्रामीण, उस्मानाबाद, मुंबई अशा विविध ठिकाणी काम केले असून तीस वर्ष त्यांनी सेवा बजावली.
उत्तम जाधव जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून काम पाहत होते.त्यांच्या कार्यकिर्दीत अनेक गुन्हे उघड झाले होते.सर्वांना आपल्या खाकीपेक्षा समजूतदारपणाने समज देऊन आपला अनोखा फंडा त्यांनी राबवित सर्वांची मने जिंकत होते.लॉकडाऊन काळात त्यांनी चांगले काम केले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना कोरोणाची लागण झाली होती.उपचारासाठी त्यांना भारती हॉस्पिटल सांगली येथे अॅडमिट केले होते. उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शांत व मनमिळावू स्वभावाचा एक उमदा पोलीस अधिकारी कोरोनामुळे हरपला आहे.

उत्तम जाधव यांचा जन्म बार्शी तालूक्यातील सवद्री(सौंदरी) या गावी शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांनी, मुंबई, सोलापूर ग्रामीण, उस्मानाबाद येथे पोलिस निरीक्षक म्हणून चांगली कामगिरी केली होती. त्यांची उस्मानाबादहून जत पोलिस ठाण्याला १३ ऑगस्ट २०२० रोजी बदली झाली होती. पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस प्रशासनाची चांगली घडी बसवली होती. कोरोना कालावधीत जनजागृतीसह चांगले काम केले होते. त्यांनी गुन्हेगारीवर वचक बसविण्यात यश मिळवले होते.धाडसी कारवाईदेखील केल्या होत्या.पदभार स्वीकारल्यानंतर जत पोलिस ठाण्याचे सुशोभीकरण करून घेतले होते.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद