मालकाचे उपोषण
पाटबंधारे विभागाच्या गिरझणी मायनरवरील प्रकार
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
कॅनॉलवरील पाण्याची गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी मशीन भाड्याने घेतले. काम सुरू असताना शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत केलेल्या दगडफेकीत मशीनचे नुकसान झाले. या घटनेनंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी मालकाला वाऱ्यावर सोडून दिले. ना त्या मशीनचे भाडे,ना नुकसानीची भरपाई! यामुळे वारंवार खेटे घालणाऱ्या जेसीबी मालकाने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारून पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.
पाणीगळती बंद करीत असताना कोंडबावी हद्दीत बेकायदेशीर पाणी नेणाऱ्या लोकांनी सहाय्यक अभियंता यांच्यासमोरच जे.सी.बी. मशीनवर तुफान दगडफेक केली. मशीन चालकाला शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेचा पाटबंधारे अधिकाऱ्यांनी व्हिडिओ, फोटो काढले होते. मात्र संबंधितांवर कोणतीही कारवाई केलेली नसून मशीनचे भाडे व नुकसान भरपाईसाठी मालकाने अनेकवेळा कार्यालयात चकरा मारल्या. या घटनेनंतर अधिकाऱ्यांचा फोन बंद असल्याने मशीन मालकाने याबाबतची तक्रार लेखी स्वरूपात दिली असून मशीनचे भाडे व नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय उपोषण न सोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
ना दाद, ना फिर्याद!
पाटबंधारे विभागातील ढिसाळ नियोजनाचे परिणाम पाणीवाटपात दिसून येत आहेत . पाटबंधारे विभागाच्या मशीन असताना खाजगी मशीनने, तेही पोलीस संरक्षण न घेता का कारवाई झाली ? अनधिकृत पाणी वापरासाठी जणू अधिकाऱ्यांचा वरदहस्त मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वादविवादाच्या प्रकारांना खतपाणी मिळत आहे. एकीकडे पाणी न मिळाल्यामुळे पिके जळताना दिसत आहेत,तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जाताना दिसत आहे.या ढिसाळ नियोजनाकडे लोकप्रतिनिधी डोळेझाक करीत असल्यामुळे अशा घटनांची ना दाद, ना फिर्याद! असा प्रकार समोर येत आहे.
“माझी मशीन साहेबांनी भाडेतत्त्वावर कामासाठी आणली होती. यावेळी दगडफेकीमुळे मशीनचे मोठे नुकसान झाले. मला कामाचा मोबदला व झालेल्या नुकसानीसाठी मी वारंवार विनंती केली. मात्र याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून टाळाटाळ केल्याने अखेर उपोषणाचा मार्ग पत्कारावा लागला आहे.”- विजय शिंदे, जेसीबी मालक
अनधिकृत पाणी उपशावर कारवाई करताना हा प्रकार झाला होता. याबाबत सहाय्यक अभियंता अमोल मस्कर कार्यालयात येऊन उपोषणकर्त्यांची चर्चा करणार आहेत.अशी माहिती शाखा अभियंता राहुल मिसाळ यांनी दिली. मात्र यावेळी सहाय्यक अभियंता अमोल मस्कर यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती