कसा हाकायचा आता ग्रामपंचायतीचा गाडा?

कोरोनामुळे होतोय ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर परिणाम
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

कर वसुली होत नसल्यामुळे विकास कामावर त्याचा परिणाम दिसून येतआहे.आर्थिक वर्ष संपले आहे. या महिन्यात ग्रामपंचायतीच्या सरासरी 50 ते 60 टक्के कर वसुली होतो. परंतु गेल्यावर्षी 2020 मध्ये ग्रामपंचायतची सर्व यंत्रणा कर वसुलीऐवजी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कामाला लागली. परिणामी घरपट्टी,पाणीपट्टीसह इतरही वसुली ठप्प झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर कोरोनामुळे परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
मागील वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र व्यवहार, व्यापार आणि जनजीवन ठप्प झाले होते. याचा गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर परिणाम झाला आहे.त्यातच आठवडा बाजारही बंद असल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना पगार कुठून द्यावयाचा? तसेच विजबिल, पाणीबिल या मासिक खर्चासह एखाद्या आपत्तीच्या काळात गावातील करावयाची स्वच्छता,औषधे फवारणी ही कामे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून करावी लागतात. त्याचसोबत विविध कामांच्या व योजनेची देखभाल दुरुस्तीचे कामे करावी लागतात.
गेल्या वर्षापासून कर वसुली नसल्यामुळे सध्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन करवसुलीसाठी भेट द्यावी लागत आहे. करवसुली नसल्यामुळे कर्मचा-यांना पगारापासून वंचित रहावे लागणार आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते संकट उभे आहे,तर दुसरीकडे निधी नसल्यामुळे ग्रामपंचायतचा कारभार या आर्थिक ओढाताणीत कसा चालायचा? असा प्रश्न आता प्रत्येक ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना सतावत आहे.