तुकाराम बाबा महाराज ‘एनयुजे महाराष्ट्र’च्या राज्य पुरस्काराने सन्मानित

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् यांच्यावतीने ‘एन यु जे महाराष्ट्र -2021’  राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी सौ.सरिता लिंगायत वास्तूशास्त्र तज्ञ व संजय धुमाळ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख मानव अधिकार संघटना हे यांच्यासमवेत उपस्थित होते.
          तुकाराम बाबा महाराज यांनी धार्मिक व सामाजिक कार्यात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तुकाराम बाबा महाराज हे कायम धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजजागृती करण्याबरोवरच जत पूर्व भागाला म्हैसाळचे पाणी मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी संख ते मुंबई मंत्रालय पायीदिंडी काढली. जत तालुक्यात भयावह दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांनी राज्यातील पहिली खाजगी चारा छावणी काढून पशुधन वाचवले. २५० हुन अधिक जणांना पाण्याच्या टाक्याचे वाटप केले. कोरोना काळात साडेसात हजार मास्क, साडेपाच हजार कुटूंबियांना जीवनावश्यक किट, २२ हजाराहून अधिक जणांना थेट घरोघरी लॉकडाऊन काळात भाजीपाला वाटप केला. गोंदिया येथे चालत निघालेल्या तरुणांना त्यांनी स्वखर्चाने त्यांच्या गावी पोहचवले. तालुक्यातील प्रतापूर, उटगी, येळदरी, खैराव, टोणेवाडी आदी गावात घर जळालेल्यांच्या घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांना मदतीचा हात देत रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्यांचे वाटप केले.
         त्यांच्या या कार्याची दखल घेत नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र यांच्यावतीने ‘एन यु जे महाराष्ट्र -2021’ चा राज्यस्तरीय पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्य अध्यक्षा शीतल करदेकर,डॉ.सुभाष सामंत (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष), लक्ष्मणराव खटके (सांगली जिल्हा अध्यक्ष), अरुणराव इंगवले (जि.प. सदस्य कोल्हापूर,) लक्ष्मण आढाव (सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष), विनयकुमार पाटील, शेखर घोंगडे, भुपेश कुंभार, जितेंद्र पाटील, पोपट वाकसे, सुनील सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.