विवाहास नकार दिल्याने बनपुरी येथील घटना
नरेंद्र दिक्षीत
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील उत्तम महादेव चौगुले या शेतकरी पित्याने आपल्या मुलीला बेडग्याच्या दांड्याने मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली. लग्नास नकार दिल्यामुळे खून करून हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला व मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. पोलीस पाटील हणमंतराव पाटील यांनी याबाबतची आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली असून आरोपी उत्तम चौगुले यास पोलिसांनी अटक केली आहे.
संशयित आरोपी उत्तम चौगुले हा आपल्या कुटुंबासमवेत बनपुरी येथील करगणी मार्गाजवळ राहत होता. मुलगी ताई हिने लग्नास नकार दिल्याने तिला बेडग्याच्या दांड्याने मारहाण केली.त्यात तिचा मृत्यू झाला. परंतु हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे भासवून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. याबाबत गेल्या आठवडाभरापासून परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेची पोलीस पाटील हणमंतराव पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या