दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना लसीकरणाची मागणी

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

सांगली जिल्ह्यातील सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कोविड १९ या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करावे अशी मागणी प्रभारी सहजिल्हा निबंधक वर्ग -२ तथा प्रशासकिय अधिकारी सांगली यांनी जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी सांगली यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
त्यानी निवेदनात म्हटले आहे की, नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत दस्त नोंदणीचे कामकाज केले जाते. दस्त नोंदणीचे माध्यमातून शासनाला राज्यात दुसरे क्रमांकाचा महसुल जमा होतो.दुसरे क्रमांकाचा महसुल मिळवून देणारा हा विभाग आहे.
सद्या शासनाने माहे सप्टेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत टप्या टप्याने मुद्रांक शुल्कात सवलत दिलेली आहे. सदर सवलतीचा फायदा ३१ डिसेंबर २०२० च्या आधीच दस्त निष्पादीत करून ठेवले आहेत. अशा निष्पादित केलेल्या दस्ताची दि.१ जानेवारी २०२१ पासून ते ३१ मार्च २०२१ पर्यंत २ टक्के मुद्रांक शुल्क सवलत आहे.त्यामुळे अशा दस्तांची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
सहदुय्यम निबंधक कार्यालयात शहरी भागात दररोज ६० ते ७० व ग्रामीण भागात दररोज ३५ ते ४० दस्तऐवजाची नोंदणी होते.प्रत्येक दस्तऐवजामध्ये लिहून घेणार, लिहून देणार, साक्षीदार व ओळखदार अशा पाच-सहा व्यक्ती असतात.
अशातच दस्तनोंदणीवेळी थंबप्रेस मशिनवर दुय्यम निबंधक यांना प्रत्येकवेळी थंबप्रेस करावा लागतो. त्यामुळे दुय्यम निबंधक व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यातच मिळकतीचा शोध घेणे, मिळकतीचे बाजारमुल्य निश्चित करणे, नोंदणी झालेल्या दस्ताच्या प्रमाणीत प्रती घेणे इत्यादी कामासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी होते.त्यामुळे दररोज दुय्यम निबंधक कार्यालयात पाचशे ते सहाशे नागरिक भेट देतात.
जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक व कर्मचारी यांचा जिल्हास्तरावरील व विभागीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी थेट संबंध येतो.तसेच जिल्हा व विभागीय स्तरावर दैनंदिन कामकाजासाठी नागरिक भेट देत असतात.
त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस लवकरात लवकर द्यावी अशी मागणीही प्र. सहदुय्यम निबंधक वर्ग- २ तथा प्रशासकिय अधिकारी सांगली यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्याधिकारी सांगली यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.