अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व केंद्रीय रेल्वे बोर्डाचे विद्यमान संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी जत तालुक्याच्या विकासाशी निगडीत अनेक प्रलंबित प्रश्न घेऊन जत येथील प्रांत कार्यालयासमोर सोमवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक उपोषण केले. कृष्णा खोऱ्याच्या विस्तारित म्हैसाळ योजनेला मान्यता देऊन जत तालुक्याच्या पूर्व भागातील कृष्णेच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना तात्काळ पाणी द्यावे, तसेच विस्ताराने जिल्ह्यातच मोठा असलेल्या जत तालुक्याचे त्रिभाजन करावे किंवा माडग्याळ आणि उमदी या दोन गावांमध्ये स्वतंत्र अप्पर तहसील मंजूर करून तेथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी या दोन प्रमुख मागण्यांसह तालुक्याच्या विकासाशी संबंधित विविध 19 मागण्यांना घेऊन जमदाडे यांनी लाक्षणिक उपोषण केले.
जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे व तहसीलदार सचिन पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन निवेदन स्वीकारले.तसेच निवेदनातील मागण्यांसंदर्भात शासनाला कळवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
या उपोषणास सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील, डॉ. रवींद्र आरळी, अॅड. श्रीपाद अष्टेकर, जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सिद्धू शिरशाड, अॅड. बसवराज दोडमनी, युवानेते मोहन ऊर्फ भैय्या कुलकर्णी, मुचंडीचे सरपंच अशोक पाटील, सोमनिंग बोरामणी, रवींद्र सावंत, लक्ष्मण सिद्धरेड्डी,सौ.मीनाक्षी अक्की,सौं.श्रीदेवी जावीर आदींनी पाठिंबा दिला.खासदार संजयकाका पाटील यांनी खास दिल्लीहून दूरध्वनी करून उपोषणाला पाठिंबा दिला.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन