ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचा खर्च शेतकऱ्यांनी देऊ नये:आबासाहेब ऐवळे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीच्या कृषी पंपाच्या रोहीत्रात बिघाड झाल्यास किंवा ते रोहीत्र जळाल्यास त्याचा दुरूस्तीचा खर्च शेतक-यानी देऊ नये असे आवाहन अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांनी केले आहे.
ऐवळे यांनी महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी, जतचे उपकार्यकारी अभियंता तथा माहिती अधिकारी यांच्याकडे माहिती अधिकाराखाली रोहीत्र बिघाडलेस अथवा जळालेस त्याच्या दुरूस्तीचा खर्च कोण करणार यासंदर्भात लेखी अर्जाव्दारे माहीती मागविली होती.
जतसारख्या दुष्काळी तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला शेतकरी आपल्या शेतातील पिकांना पाणी देत असताना महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीचे रोहीत्र जळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. अशा घटना घडल्यामुळे शेतकरी बांधवांच्या विद्यूत मोटारीचा वीजपुरवठा बंद होऊन त्याचा परिणाम त्यांच्या बागायती शेतीवर होत असतो.अशा वेळी आपले बागायत पिक यामध्ये केळी, द्राक्षे,डाळींब,ऊस तसेच मका अशी पिके वाचविण्यासाठी शेतकरी महाराष्ट्र विजवितरण कंपनीच्या कार्यालयात हेलपाटे घालून मेटाकुटीस आले आहेत.
अशा वेळी येथील अधिकारी हे रोहीत्र जळण्याच्या घटनेचे खापर शेतकरी बांधवावर फोडून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करतात व तुम्हाला जर ताबडतोब तुमचे रोहीत्र दुरूस्त करून पाहीजे असेल तर आमचे कर्मचारी घेऊन जा व टी.सी.काढून तो ट्रॅक्टरवर ठेवून आमच्याकडे पाठवा व तुमच्या ग्रुपमधील सर्व विद्यूत मोटार मालकानी टि.सी.(रोहीत्र) दुरूस्तीसाठी पैसे जमा करून द्या.असे विद्युत मोटारधारक शेतकरी बांधवांना सांगून त्यांच्याकडून रोहीत्र दुरूस्तीसाठी रक्कम घेऊन रोहीत्र दुरूस्ती करून देण्याचे काम करीत आहेत.
विजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांचा हा कारभार वर्षानुवर्षं सुरूच असून ऐन उन्हाळ्याच्या सुरूवातीला व उन्हाळ्यात ज्या शेतकरी बांधवांची रोहीत्र बिघडली आहेत किंवा ती जळाली आहेत अशा सर्व विद्धूत ग्राहकांना याचा अनुभव आलेला आहे.
विजवितरण कंपनीकडील विद्युत रोहीत्र जळण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून ही रोहीत्र दुरूस्ती करण्याचे काम कंपनीने नेमलेल्या ठेकेदाराचे आहे.कृषी पंपाला वीजपुरवठा करणारे रोहीत्रात बिघाड झाला असल्यास विभागीय कार्यालयांतर्गत येणारे फिल्टर युनिटव्दारे हे रोहीत्र ठेकेदाराकडून बदलले जातात.रोहीत्रास लागणारे तेल व इतर दुरूस्ती करण्याची कामे महावितरणकडून केली जातात.अशी माहितीही उपकार्यकारी अभियंता तथा माहिती अधिकारी महाराष्ट्र विजवितरण कंपनी जत यांनी लेखी स्वरुपात दिली असल्याने यापुढे कोणाही शेतकरी बांधवांची फसवणूक होऊ नये यासाठी सार्वजनिक रित्या ही माहीती प्रसिद्ध केली आहे असेही ऐवळे म्हणाले व कोणीही रोहीत्र बिघडल्यास त्याचा खर्च स्वतःहून न करता तो विजवितरण कंपनीला करण्यासाठी त्यांना भाग पाडावे असे आवाहनही ऐवळे यांनी केले आहे.