महिला सक्षमीकरणाचे विविध कार्यक्रम

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (IFAD) या संस्थेच्या वतीने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सन २०१२ मध्ये महाराष्ट्रात ३०० बचत गटांसाठी एक अशा महाराष्ट्र भर प्रत्येक तालुक्यात महिलांच्या लोकसंस्था उभारण्यात आल्या.
आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर महिला शेतकऱ्यांच्या हलाखीच्या काळात झालेले आर्थिक नुकसान व शेतीतून घटलेल्या आर्थिक उत्पादनास हातभार लावण्याच्या दृष्टीने GIZ या जर्मन सरकारच्या संस्थेने महाराष्ट्रात Bayer या कीटकनाशके,बियाणे निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून महिला आर्थिक विकास महामंडळाने विविध जिल्ह्यात स्थापित केलेल्या लोकसंचलीत साधन केंद्राच्या बचत गटातील महिला शेतकऱ्यांना विविध प्रकारचे बियाणे,कीटकनाशके व खते सवलतीच्या दरात महिला शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचा कार्यक्रम हाती घेतला.
महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत जिल्ह्यातील क्रांती लोकसंचलित साधन केंद्र जत व नवप्रभा लोकसंचालीत साधन केंद्र मिरज कार्यक्षेत्रातील प्रत्येकी २०० अशा एकूण ४०० महिला शेतकऱ्यांना प्रत्येकी एक एकर क्षेत्रासाठी लागणारे उच्च प्रतीची मक्याचे बियाणे,लष्करी अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक कीटकनाशके,व द्रवरूप खते अत्यंत अल्प व सवलतीच्या दरात वाटप करण्यात येत आहे.
या माध्यमातून कोविड महामारीच्या काळात झालेल्या महिला शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असून थोड्या प्रमाणात त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास हातभार लागणार आहे.यासाठी बायर कंपनीच्या वतीने पीक लागवड तंत्रज्ञान,पीक व्यवस्थापन,अळी व कीड व्यवस्थापन तसेच खतांचा सुयोग्य वापर याविषयी मार्गदर्शन आयोजित करून स्पर्धात्मक उत्पादन वाढीचे तंत्र महिला शेतकऱ्यांना शिकविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमप्रसंगी उपविभागीय कृषी अधिकारी जत  काय करू मनोजकुमार वेताळ ,तालुका कृषी अधिकारी मेडेदर यांच्या हस्ते महिला शेतकऱ्यांना कीटकनाशके,व द्रवरूप खते वाटप करण्यात आले.माविम जिल्हा कार्यालयाच्या वतीने सचिन कांबळे,जिल्हा समन्वय अधिकारी,कल्पेश उमराणीकर सहा.जिल्हा समन्वय अधिकारी,GIZ प्रकल्प समन्वयक महीपत नलावडे,क्रांती लोकसंचलीत साधन केंद्राचे अध्यक्षा श्रीमती राजश्री जाधव,व्यवस्थापक पिराजी तांबे,लेखापाल प्रसाद पोतदार,सर्व सहयोगिनी व क्रांती लोकसंचलीत साधन केंद्राचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.