जत येथील सिध्दार्थ जलतरण केंद्र सुरू : डॉ. सनमडीकर

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमधून बाहेर पडत आता सर्वांसाठी जलतरण केंद्र सुरू करण्यासाठी राज्यसरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. त्यात जलतरण तलाव सुरू झाले आहेत. त्यामुळे जत येथील शेगाव रोडवरील जलतरण तलाव केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती उमाजीराव सनमडीकर संस्थेचे अध्यक्ष डॉ. कैलास सनमडीकर यांनी दिली.
क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या परवानगीने हे जलतरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्विमिंग पुलाच्या स्वच्छतेसाठी लागणारे क्लोरिन,सोडा अॅश, सोडियम कार्बोनेट आणि तुरटी अशी रसायने वापरली जातात. असे रासायनिक घटक वापरून केंद्रातील सर्व स्वच्छता कार्यक्रम मोहीम हाती घेऊन स्वच्छता करण्यात आली आहे. राज्य व आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी सर्वप्रथम खुले करण्यात आले होते. आता मात्र सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. हे जलतरण तलाव ना नफा ना तोटा या आधारावर सुरू असून नाममात्र शुल्कात या जलतरण केंद्राचा उपयोग करू शकता. सकाळी व सायंकाळी पुरुषांसाठी व दुपारच्यावेळी महिलांसाठी शिकण्यासाठी स्वतंत्र वर्ग सुरू करण्यात आले आहेत. जलतरण आवड असणाऱ्यांनी या केंद्राचा लाभ घ्यावा,असे आवाहन डॉ. कैलास सनमडीकर यांनी केले आहे.