हलगर्जी ग्रामसेवकांच्या पगारातून रक्कम वसूल करण्यात येईल: अतिरिक्त सीईओ चंद्रकांत गुडेवार

जत तालुक्‍यातील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व अपूर्ण कामाचा घेण्यात आला आढावा
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

जत तालुक्यात सन २०१९ -२० या आर्थिक वर्षात दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात हयगय करून हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामसेवकांची पगारवाढ रोखून त्यांच्या मासिक पगारातून रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी जत येथे बोलताना दिला.
          जत पंचायत समिती सभागृहात जत तालुक्‍यातील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व अपूर्ण कामाचा आढावा घेण्यात आला.यावेळी गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर,जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सुनीता पवार,विस्तार अधिकारी मनोज जाधव, एस.एस.सौदागर,पी.एस.चव्हाण उपस्थित होते. दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत जत तालुक्यात सुरू असलेली कामे ३१ मार्च २०२१ अखेर पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. जर वेळेत हा निधी खर्च झाला नाही तर ग्रामसेवकांच्या हालगर्जीपणामुळे निधी शासनाकडे परत गेला, म्हणून ग्रामसेवकांच्या मासिक पगारातून वसुली करून घरकुलाचे काम पूर्ण करुन घेण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
         तसेच पशुवैद्यकीय दवाखाना,प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी शाळा खोली इमारत इत्यादी नादुरुस्त इमारतीचे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारी रक्कम त्यांना देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत असेही चंद्रकांत गुडेवार यांनी यावेळी सांगितले.