अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
संत हे आपली व परमेश्वराची भेट घडवून आणण्याचे व आपल्या जीवनातील अज्ञानरूपी अंध:कार दूर करून आपल्याला सन्मार्ग दाखविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे आपण नेहमी संतसंगतीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन ह.भ.प.सुशांत जाधव महाराज (वडजलकर) यांनी केले आहे.
ते येथील राजे शिवाजी महाराज नगर या ठिकाणी नव्यानेच बांधण्यात आलेल्या श्री. स्वामी समर्थ मंदिराचे उदघाटन कार्यक्रमप्रसंगी मार्गदर्शन करताना बोलत होते.
स्वामी समर्थ चॅरिटेबल ट्रष्ट जतचे अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब पवार हे स्वामीभक्त असून त्यांनी आपली स्वत:ची साडेपाच गुंठे जागा स्वामी समर्थ मंदिरासाठी दिली आहे. याच जागेवर येथील अभियंता स्वामी समर्थ भक्त,विश्र्वनाथ शिंदे व त्यांचे सुपुत्र अभियंता कपिल शिंदे यांच्या कल्पनेतून एका सुंदर मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन ह.भ.प. सुशांत महाराज वडजलकर यांच्या शुभ हस्ते व जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
दोन दिवस श्री. स्वामी समर्थ मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रम व विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते.सांगली येथील पुजारी पांडुरंग कृष्णाजी वझे व त्यांचे सुपुत्र अनिरुद्ध यांनी सर्व धार्मिक विधी पार पाडले. यानंतर हींचगिरी संप्रदाय जुनोनी मठाचे मठाधिपती स.स.श्री.धोंडोपंत महाराज व प्रसिद्ध किर्तनकार सागर महाराज बोराटे यांच्या उपस्थितीत मंदिरात प्रसन्न व मंगलमय वातावरणात श्री. स्वामी समर्थ महाराज,श्री.गणेश व जुनोनी मठाचे मठाधिपती श्री.कवलेमहाराज यांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यावेळी प्रबोधन करताना सुशांत महाराज पुढे म्हणाले की, आपल्यावर प्रथम देवाचे उपकार आहेत.त्यानंतर आपल्यावर आपल्या आईवडिलांचे उपकार आहेत. नंतर आपल्यावर आपल्या जन्मभूमीचे उपकार आहेत. तर आपण बाहेरील शत्रूपासून सुरक्षित रहावे म्हणून आपल्या रक्षणासाठी व मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वताच्या छातीवर गोळ्या झेलणारे सैनिकांचे आपल्यावर उपकार आहेत. या उपकाराची आपण काही केल्या परतफेड करू शकत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.
आपण चांगल्याच्या संगतीत राहिलो तर आपले चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच वाईटाच्या संगतीत राहिलो तर आपले वाईटच होत राहणार, त्यामुळे संताची संगत धरा,त्यासाठी नित्य श्री ज्ञानेश्वरी व हरिपाठाचे पठण करा तरच आपण परमेश्वराशी एकरूप होऊ असेही महाराज म्हणाले.
प्रत्येकाने आपणाला मिळणाऱ्या पैशातून थोडेतरी दान सत्कर्मासाठी करावे,कारण दान केल्यानेच धन वाढते.त्यामुळे दान करीत रहावे असेही महाराज म्हणाले.
या कार्यक्रमाचे नियोजन ट्रष्टचे अध्यक्ष बापूसाहेब पवार,उपाध्यक्ष अशोक तेली,श्रीकृष्ण पाटील,दिपक पाटणकर,नारायण पवार,मोहन पवार,शंकर वाघमोडे, सदाशिव जाधव (तात्या) आदिंनी केले होते.
यावेळी सुधीरदादा चव्हाण,माजी मुख्याध्यापक वसंतराव बोराडे,डाॅ.शालीवाहन पट्टणशेट्टी,दुय्यम निबंधक सुनिल पाथरूट, उपकोषागार अधिकारी सुतार, इंजनिअर विश्वनाथ शिंदे,इंजिनिअर स्वप्निल बोराडे,इंजिनिअर धैर्यशिल चव्हाण,बी.टी.चव्हाण, सुनिल एकुंडे आदी स्वामी समर्थ भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती