
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
वाळूच्या भरलेल्या गाड्या हस्तकामार्फत सोडून देणाऱ्या तहसिलदारांची खातेनिहाय चौकशी करून गुन्हा दाखल करावा अन्यथा आरपीआयच्या वतीने आज 24 नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आरपीआयचे आटपाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षापासून आटपाडी तालुका महसूल विभागाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यास तहसिलदार जबाबदार आहेत. गेल्या तीन वर्षापासून आटपाडी तालुक्यात वाळूमाफियांनी थैमान घातले आहे. बरेच तलाठी, कोतवाल यांच्या अंगावर वाळूमाफियांनी गाड्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे एखाद्या कर्मचार्यांचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का?
तहसिलदारांनी वाळूची एकही गाडी पकडून आणलेली नाही याची चौकशी करावी.तहसिल कार्यालयाचे तलाठी व बाहेरचे एजंट हाताशी धरून काळ्या सोन्यावर तहसीलदार फार मोठा डल्ला मारत मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती गोळा केली आहे.
गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक नवीन लोकांनी वाळूचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रस्थापित व धनदांडग्या वाळू तस्करांच्या दबावामुळे तहसिलदारांनी त्यांची डमडम, टेम्पो पकडून आणली आहेत.
गेल्या तीन वर्षापासून आजतागायत जेवढी वाहने त्यांनी आणली आहेत,त्यातील निम्म्या वाहनांचा त्यांनी पंचनामाही केला नाही. त्यांच्याकडे एकूण जप्त केलेल्या गाड्यांचा तपशील नाही.गेल्या तीन वर्षात ज्यांची वाहने जप्त केलेली आहेत, किती वाहनधारकांना नोटीस पोहोच केली? पैकी किती वाहनधारकांनी महसूल दंड भरून वाहणे सोडवून घेतली? आणि सध्या तहसीलदार यांच्या कक्षेत असलेल्या वाहनांच्या साहित्याची चोरी झाली आहे? किती वाहने चोरीला गेले आहेत? त्या सर्व वाहनांचे पंचनामे झाले आहेत का? ही सर्व वाहने रजिस्टरला नोंद केली आहेत? ही सर्व वाहने रजिस्टरला नोंद केली आहेत ? पडलेल्या सर्व वाहनांचा मेळ घेतला आहे का? या सर्व बाबींची तहसील कार्यालयाकडे कोणतीही नोंद नाही असेही निवेदनात म्हटले आहे.
या सर्व बाबींचा गंभीर तपास करून झालेल्या भ्रष्टाचारास तहसीलदार जबाबदार आहेत.त्यामुळे असे भ्रष्ट तहसिलदार व त्यांचे हस्तक असलेले काही तलाठी व एजंट यांची चौकशी होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे, अन्यथा 24 नोव्हेंबर रोजी आटपाडी तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन