

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय,आटपाडी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दीपावलीनिमित्त यपावाडी पाटी येथे माळरानावर झोपडीत राहणाऱ्या 27 कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप केले. हे कुटुंब जालना व बीड या भागातून आलेले आहेत. ते विहीर खुदाईची आणि गाळ काढण्याचे काम करतात. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे त्यांना रोजगार मिळत नाही म्हणून तेथील पुरुष व महिला हे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये रोजंदारी साठी जातात. काहींना काम मिळत नसल्याने लहान मुलांचा सांभाळ करने सुद्धा खूप अवघड झाले आहे. त्यांना दिवाळी साजरी करता येत नाही म्हणून महाविद्यालयाच्या वतीने सर्वांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात आले. त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माजी विद्यार्थी आणि कार्यक्रम अधिकारी यांच्या वतीने एकूण 27 कुटुंबांना ब्लॅंकेट देण्यात आली. या उपक्रमास प्रा. सदाशिव मोरे, जिल्हा समन्वयक, डॉ. धनंजय लोहार, कार्यक्रम अधिकारी, डॉ. के. बी. जाधव व माजी विद्यार्थी दत्ता पुसावळे, ज्ञानेश्वर कुंभार, राहुल बाबर, गणेश चव्हाण, लक्ष्मण पवार, सूर्यकांत पुसावळे, सागर पाटील, महेश पाटील,गणेश माने, तानाजी भोसले, राहुल पाटील इत्यादी उपस्थित होते.
आटपाडी पोलीस स्टेशन येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पोलिसांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली. पोलिसांना आपल्या कामामुळे दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरी दिवाळी साजरी करता येत नाही. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांसह दिवाळी साजरी केली. यावेळी सतीश भिंगे यांचे हस्ते बजरंग कांबळे, पोलीस निरीक्षक यांचा सत्कार करण्यात आला आणि सर्वांनी आणलेले दिवाळीचे फराळाचा एकत्र बसून आस्वाद घेतला.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद