सिंदूर येथे ५१ लाखांचा गांजा जप्त;जत पोलिसांची कारवाई

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:

सिंदूर ता.जत येथे पोलिसांनी छापा टाकत ५१,९३,३००/- रूपये किंमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी बसाप्पा खुशावा आक्कीबाट रा. सिंदूर, ता.जत याला जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ०२.११.२०२० रोजी जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की बसाप्पा खुशावा आक्कीबाट रा. सिंदूर, ता. जत, जि. सांगली याने त्याचे हळदीचे पिकात गांजाची लागवड करून जोपासना करीत आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याने या बातमीबाबत वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली छाप्याचे नियोजन केले. दोन शासकीय पंचासमक्ष तसेच पोलीस फौज फाट्यासह बसाप्पा खुशावा आक्कीवाट याच्या सिंदूर गावच्या हद्दीतील जमीन गट नं.४२८ मध्ये असलेल्या हळदीचे पिकात छापा टाकला असता गांजाची ५ ते ६ फुट उंचीची झाडे मिळून आली. मिळून आलेल्या गांजाच्या झाडाचे वजन केले असता ते ५२० किलो भरले. या छाप्यामध्ये ५१,९३,३००/- रूपये किंमतीची गांजाची झाडे वाढविलेल्या स्थितीत मिळून आली आहेत. या ठिकाणी मिळून आलेली गांजाची झाडे सविस्तर पंचनाम्याने जप्त करून ताब्यात घेतली असून याबाबत जत पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बसाप्पा खुशाबा आक्कीवाट यास ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली जतचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक दीक्षीत गेडाम,अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले,उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, सपोनि मोहीते,पोलीस कॉन्स्टेबल वीर,जवंजाळ,पोलीस नाईक हाक्के,थोरात, मासाळ,चव्हाण,चव्हाण,फकीर,मुजावर, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, खोत, माळी यांनी पार पाडली.

जत पोलीस ठाणे हद्दीतील अशा प्रकारच्या अवैध कृत्याविषयी कोणास माहीती असल्यास त्याची माहिती पोलीस ठाण्यास द्यावी,माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवले जाईल असे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांनी आवाहन केले आहे.