महिला बचत गटांच्या विविध मागण्यांसंदर्भात मनसेचा लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुख्तार मणियार
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/औसा:

राज्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांना जो कर्जपुरवठा करण्यात आला आहे,ते संपूर्ण महिला बचत गटाचे कर्ज माफ करण्यात यावे, मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्जाची वसुली सक्तीने केली जात आहे,ती तात्काळ थांबवावी आणि ग्रामीण भागातील महिला बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी अविरतपणे सेवा देणाऱ्या उमेद अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी / कर्मचारी यांच्या थांबवलेल्या फेर नियुक्तीचे आदेश तात्काळ द्यावेत. तसेच हे अभियान इतर यंत्रणेद्वारे राबविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा, या प्रमुख मागणीकरिता दि. 12 ऑक्टोंबर 2020 सोमवार रोजी दुपारी 1 वा. मनसे शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोषभाऊ नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्ह्यातील अनेक महिला बचत गटाच्या माता-भगिनीं उपस्थित राहुन एक नंबर चौकापासून नवीन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या मोर्चामध्ये सहभागी महिला हातामध्ये आपल्या विविध मागण्यांचे फलक घेऊन घोषणाही देत होत्या. मोर्चा नंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात संतोष नागरगोजे, डॉ. नरसिंह भिकाणे, दिलीप धोत्रे, भास्कर औताडे, संजय राठोड, रविकिरण सुर्यवंशी,मनोज अभंगे,भागवत शिंदे,उमाटे, बाळासाहेब मुंडे, शिवकुमार नागराळे, मुकेश देशमाने आदि पदाधिकारी उपस्थित होते.