
घरफोडी,८ मोटर सायकल, २० तोळे सोने चोरी करणारी टोळी जेरबंद
सदाशिवनगरच्या चोरीचा गुन्हा उघड;
माळशिरस पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी!
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:
माळशिरस परिसरात जबरी चोरी ,घरफोडी ,मोटर सायकल चोरी करणारी टोळी माळशिरस पोलिसांनी जेरबंद केली असून त्यांच्याकडून २० तोळे सोने ,८ मोटर सायकली ,मोबाईल ,टी.व्ही असा एकूण १२ लाखांचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पोलीस निरीक्षक विश्वंबर गोल्डे ,सहा.पो नि.शशिकांत शेळके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
जाधववाडी (माळशिरस ) येथे घनधाम जाधव यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून कपाटाच्या चाव्या ताब्यात घेऊन कपाटातील २० हजार ,२ मोबाईल ,चोरून नेल्याची घटना दि.१६ सप्टेंबर रोजी घडली होती .याचा तपास करताना सहा पो.नि.शशिकांत शेळके यांना खबऱ्याकडून सदरचा गुन्हा सुरज काळे, सुरज जाधव व दोन अल्पवयीन मुलांनी केला असल्याचे समजले. अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.त्यानुसार सुरज काळे ,सुरज जाधव यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्याबरोबर सातारा,कोल्हापूर,पुणे ,नगर जिल्ह्यात घरफोडी ,मोटर सायकल अशा अनेक चोऱ्या केल्याचे कबूल केले .पोलिसांनी चोरून नेलेल्या आठ मोटर सायकली ,२० तोळे सोने ,४ मोबाईल ,टी.व्ही असा १२ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.
सदाशिवनगरच्या बियर शॉपीमधील चोरीचा गुन्हा उघड
सदाशिवनगर येथील बियर शॉपीमधून गेल्या दोन वर्षापूर्वी दुकानातील ३१ हजार रुपये रोख व दोन मोबाईल तीन इसमांनी दमदाटी करून नेल्याची घटना घडली होती. याबाबत खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती नुसार गणेश हाके (सदाशिवनगर ) यास ताब्यात घेतले असता वरील गुन्हा दोन साथीदाराच्या सहाय्याने केला असल्याची कबुली दिली .त्यानुसार संदीप लवटे (रा.मेडद ) यास पोलिसांनी अटक केली असून अद्याप सम्राट खरात (मलवडी,ता.माण ) हा फरार आहे.,
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते ,अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे ,उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू व पो. नि.विश्वंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पो. नि.शशिकांत शेळके ,पो.कॉ.सचिन हेंबाडे,समाधान शेंडगे ,सोमनाथ माने ,दत्तात्रय खरात ,अमोल बकाल ,सैफन अन्सारी,राहुल रूपनवर ,शहाजी मोटे,प्रणय शिंदे,गणेश गायकवाड ,सचिन डुबल,सुशील साळुंखे ,अन्वर आतार ,मनोहर माने ,विजयकुमार भरणे,रवी माने ,असिफ शेख ,सचिन गायकवाड ,केशव पवार यांनी केली.


संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या