अनैतिक संबंधातून धनाजी मोटेची गोळ्या झाडून हत्या

गावठी पिस्तुलसह चार गोळ्या जप्त;चौघांवर गुन्हा दाखल

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार व गुंड धनाजी नामदेव मोटे (वय 45 , रा. कंठी, ता. जत) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोके दगडाने ठेचून निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अनैतिक संबंधाच्या कारणातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. संगनमताने खून केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटे यांच्या हत्याप्रकरणी संशयित नागेश भीमा लांडगे, गोविंद नागेश लांडगे, मुरलीधर मधुकर वाघमारे, श्रीधर मधुकर वाघमारे या चौघांवर संगनमताने खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. त्याचा शोध घेतला असता एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान जत पोलिस पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनाजी मोटे याचेवर हत्यारांची तस्करी यासह अनेक गुन्हे जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत.तसेच सांगली शहर पोलिसातही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरूवारी मध्यरात्री एकच्या सुमारास धनाजी मोटे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोक्‍यात दगड घालून निघृणपणे खून केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली होती. 
दरम्यान,शुक्रवारी पहाटे घटनास्थळी मृतदेहाजवळ दुचाकी व बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. तर जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तपासाची चक्रे फिरवत जत पोलिसांकडून एका संशयित आरोपीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.तर अन्य आरोपींच्या शोधात जत पोलिसांची तीन पथके तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखांची पथके रवाना केली आहेत.

खून पिस्तूलने का दगडाने ?
मोटे यांच्या मृत्यदेहाजवळ पिस्तूल व चार गोळ्या सापडल्याने हा खून पिस्तूलने केला आहे का किंवा दगडाने केला आहे याबाबत शंका निर्माण झाली आहे. यामुळे जतमध्ये शवविच्छेदन न करता मिरज येथे मृतदेह पाठवण्यात आला आहे.रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते.पोस्टमार्टम अहवालात हा खून पिस्तूलने केला आहे का दगडाने केला आहे हे समजणार आहे.